Advertisement

मुंबई पोलिसांची दिलिप कुमार यांना अनोखी श्रद्धांजली, ट्विट व्हायरल

मुंबई पोलिसांनीही नेहमीप्रमाणे वेगळ्या शैलीत ट्वीट करत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबई पोलिसांची दिलिप कुमार यांना अनोखी श्रद्धांजली, ट्विट व्हायरल
SHARES

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झाल्यानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. श्वसनाचा त्रास होत असल्यानं हिंदुजा रुग्णालयात दाखल असलेल्या दिलीप कुमार यांनी बुधवारी सकाळी ७.३० वाजता अखेरचा श्वास घेतला.

दिलीप कुमार यांचं निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहे. मुंबई पोलिसांनीही नेहमीप्रमाणे वेगळ्या शैलीत ट्वीट करत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुंबई पोलिसांच्या सध्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या चित्रपटांच्या नावांचा वापर केला आहे. “दिलीप साहेब आम्ही आमच्या ‘कर्मा’शी सच्चे राहू आणि आपली सर्व ‘शक्ती’ कायद्याची (कानून) ‘मशाल’ पेटती ठेवण्यात गुंतवू”.

‘कर्मा’, ‘शक्ती’, ‘कानून’ आणि ‘मशाल’ हे दिलीप कुमार यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी आहेत. या चित्रपटातील त्यांच्या जबरदस्त भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्या कारणानं जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती.

उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

मात्र उपचारादरम्यान दिलीप कुमार यांचं निधन झालं. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या सिनेमातून १९४४ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवलं आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’ अशा कितीतरी सिनेमांची नावे घेतला येतील.

पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘मुगल-ए-आजम’ मधील सलीमप्रमाणेच ‘देवदास’ चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो.



हेही वाचा

फळ विक्रेता ते अभिनेता, असा होता 'ट्रॅजेडी किंग'चा जीवनप्रवास

दिलिप कुमार-मधुबाला यांची अधुरी प्रेमकहाणी, 'या' घटनेनंतर आला नात्यात दुरावा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा