Advertisement

सावध असा...बाळासाहेबांचा 'ठाकरे' येतोय!

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिक 'ठाकरे'चा टीझर आणि पोस्टर गुरुवारी थाटात लाँच करण्यात आले. चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

SHARES

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिक 'ठाकरे'चा टीझर आणि पोस्टर गुरुवारी थाटात लाँच करण्यात आले. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. अभिजीत पानसे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. यासाठी राऊत यांना चार वर्षांचा कालावधी लागला.


कधी सुरू होणार शुटिंग?

२०१८ मध्ये मार्च किंवा फेब्रुवारीत चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. चित्रीकरण ८० दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. २३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लाँचिंग सोहळ्याला संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांसोबत मी जास्त काळ घालवला आहे. त्यांना मी जास्त ओळखतो. बाळासाहेबांच्या आयुष्यात असं बरंच काही आहे, जे मोठ्या पडद्यावर दाखवलं जाऊ शकतं. बाळासाहेबांचं काम हे प्रेरणादायी आहे, असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी देखील यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. इतिहास घडवणाऱ्या महापुरुषावर आधारीत हा चित्रपट पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. हा हिरो-हिरोईनचा चित्रपट नाही, सामान्य माणसाला हिरो बनवणाऱ्या बाळासाहेबांवर आधारीत हा चित्रपट आहे, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.


चित्रपटाच्या टीजरमध्ये नवाजुद्दीनला बघितलं, तर हुबेहुबे बाळासाहेबांसारखा तो दिसत आहे. केवळ दिसणं नाही, तर त्याने भूमिकाही तशीच निभावली आहे. ज्याप्रमाणे बाळासाहेब नमस्कार करायचे, त्याचप्रमाणे टीजरमध्ये नवाजुद्दीनने केला आहे. त्यामुळे मला खात्री आहे, ही भूमिका नवाजुद्दीन योग्य प्रकारे निभावेल.

अभिजीत पानसे, दिग्दर्शक


'बाळासाहेबांवर वेबसिरीज करा'

बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तिमत्व ३ तासांच्या चित्रपटात सामावणे कठिण आहे. त्यामुळे ८-१० भागांची चित्रपटांची मालिका करा, बाळासाहेबांच्यावर वेबसिरीज करा, अशी इच्छा अमिताभ बच्चन यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा