Advertisement

तंत्रज्ञान व मानवतेचा संगम घडवणारा रिलोडेड कल्पनाविष्कार!


तंत्रज्ञान व मानवतेचा संगम घडवणारा रिलोडेड कल्पनाविष्कार!
SHARES

काही दिग्दर्शकांच्या चित्रपटांची सर्वचजण आतुरतेने वाटत पाहात असतात. त्यापैकीच एक आहेत एस. शंकर. पहिल्या भागात मानवावरच वरचढ झालेल्या रोबोशी घनघोर लढाई दाखवल्यानंतर दुसऱ्या भागात ते एक वेगळाच कल्पाविष्कार घेऊन आले आहेत. तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या मानवाला मानवतेचा संदेश देणारा हा खेळ व्हिएफएक्सच्या साथीने शंकर यांनी रुपेरी पडद्यावर मांडला आहे. मनोरंजनासोबतच एक सशक्त संदेश मनामनापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.


या चित्रपटचं खास आकर्षण आहेत रजनीकांत... रजनीचा चित्रपट म्हटला की, तो केवळ दक्षिणेकडीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सिनेरसिकांचं लक्ष आपोआप वेधून घेतो. वयाची पासष्ठी ओलांडूनही रजनी ज्या प्रकारे वाऱ्याच्या गतीने हालचाली आणि नृत्य करतात ते सारं अचंबित करणारं आहे. या चित्रपटात त्यांच्या जोडीला अक्षयकुमार असल्याने दोघांच्याही चाहत्यांसाठी हा दुग्धशर्करा योग आहे. दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी हा या चित्रपटाचा आणखी एक प्लस पॅाइंट आहे.

चित्रपटाची सुरुवात एका वृद्ध व्यक्तीने मोबाईल टॅावरला लटकून गळफास घेतलेल्या दृष्याने होते. त्यानंतर शहरातील सर्वांचेच फोन त्यांच्या हातून हवेत उडतात आणि ठराविक अंतरावर जाऊन गायब होतात. या प्रकाराने सर्वसामान्य नागरिकांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्व त्रस्त होतात. एका महाभयंकर पक्ष्याची सावली शहरावर पडते आणि तो पक्षी हाहाकार माजवतो. या भयावह परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार डाॅ. वसीकरण (रजनीकांत) आणि त्याची पर्सनल सेक्रेटरी रोबो नीला (अॅमी जॅक्सन) यांच्याकडे धाव घेतात. घटनेचा शोध घेतल्यावर वसीकरण पहिल्या भागात निर्बंधित करण्यात आलेल्या रोबो चिट्टीला पुन्हा अॅक्टीव्ह करण्याची परवानगी मागतो, पण पहिल्या भागातील डाॅ. बोहरांचा मुलगा (सुधांशू पांडे) यावर आक्षेप घेतो. 

त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याला पाचारण केलं जातं. त्यांचाही त्या पक्ष्यापुढे निभाव लागत नाही. सरकारकडून अनुमती नाकारली जाऊनही वसीकरण चिट्टीला अॅक्टीव्ह करण्याचं काम सुरू करतो. इकडे सरकारही हार मानतं आणि चिट्टीला परत बोलावण्याची परवानगी देतं. चिट्टीचा जेव्हा त्या पक्ष्याशी सामना होतो, तेव्हा एक महाभयंकर सत्य समोर येतं. पक्षी बनून संपूर्ण शहराला वेठीस धरणारा पक्षीराजन (अक्षयकुमार) जेव्हा खरी कथा सांगतो, तेव्हा कोणीतरी चिमटा घेतल्याप्रमाणे कल्पनाविश्वाच्या त्या विश्वातून बाहेर पडत वास्तवातही हीच परिस्थिती असल्याची जाणिव होते.

व्हिएफक्सचा अफलातून खेळ या चित्रपटात पाहायला मिळतो. पहिल्या भागाप्रमाणे या भागातही शंकर यांनी या चित्रपटाच्या कथेला एका सामाजिक जाणिवेची जोड दिली आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नसून, त्यासोबतच एक मोलाचा संदेशही देणाराही आहे. या चित्रपटातील व्हिएफएक्सला थ्रीडी तंत्रज्ञानाची जोड देत '२.०' सोबतचा प्रवास आणखी थरारक करण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी त्याची गरज होतीच असं म्हणता येणार नाही. कारण थ्रीडीचा इफेक्ट तितकासा जाणवत नाही. पहिल्या भागात नायिका मानव आणि नायक रोबो अशी कथा होती, पण या भागात नायक आणि नायिका दोघेही रोबो असूनही त्यांच्यातील प्रेमकथेवर वेळ वाया घालवण्याचा मोह दिग्दर्शकाने टाळला हे चांगलं झालं.


रजनीकांत यांचा चित्रपट म्हटला की, जास्त विचार करायचा नाही हे आता केवळ दक्षिणात्य प्रेक्षकांनाच नव्हे तर जगभारातील सर्वांनाच उमगलेलं आहे. त्या तुलनेत हा चित्रपट थोडासा विचार करायलाही लावणारा आहे. पहिल्या भागाप्रमाणे या भागातही रजनी रोबोच्या भूमिकेतही स्टाइल मारत आपल्या चाहत्यांना खुश करायला विसरलेले नाहीत. मध्यंतरानंतर या चित्रपटाच्या कथेचा कल तंत्रज्ञानाकडून थोडासा भावनेकडे झुकतो आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. 

दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात प्रथम आपणच पडतो याची जाणीव करून देणारी सुधांशू पांडेची छोटीशी भूमिकाही महत्त्वाची आहे. या चित्रपटात गीत-संगीताला फारसा वाव नाही. चित्रपटाच्या शेवटी असलेलं गाणं ए. आर. रेहमान यांच्या संगीताची झलक देण्यासाठी पुरेसं आहे. फाईट सिक्वेन्सही छान आहेत. हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूपच सशक्त आहे. क्लायमॅक्सच्या दृश्यात '३.०' (तीन पॅाईंट झीरो) या मायक्रो रोबोची एंट्री करून तिसरा भागही बनणार असल्याचे संकेत दिले आहेत.


रजनीकांत यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांच्या अभिनयाची जादू आजही प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते. त्यांनी साकारलेल्या वसीकरण आणि चिट्टी या दोन्ही भूमिका लक्षवेधी आहेत. हा चित्रपट अक्षयकुमारला एक वेगळा ब्रेक देणारा आहे. चित्रपटगृहात जाण्यापूर्वी अक्षय खलनायक असल्याची धारणा सर्वांच्याच मनात असेल, पण पडद्यावरील दृश्य पाहिल्यावर याला खलनायक म्हणावा की नायक? असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. जरी त्याचा मार्ग चुकीचा असला तरी तो मानवाच्या हिताचा होता हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 


अॅमी जॅक्सनने साकारलेली रोबो नीलाही छान जमली आहे. इतर कलाकारांनीही लहानसहान भूमिकांमध्ये चांगलं काम केलं आहे. व्हिएफएक्सचा हा खेळ पडद्यावर पाहायला सुखद वाटतो. त्यासोबत दिलेला संदेश त्याहीपेक्षा मोलाचा असल्याने तंत्रज्ञान आणि मानवतेचा संगम घडवणारा हा रिलोडेड कल्पनाविष्कार एकदा तरी पाहायला हवा.
हिंदी चित्रपट  : २.० (टू पॉइंट झिरो)

निर्माते - ए. सुबस्करन, राजू महालिंगम 

दिग्दर्शक - एस. शंकर 

कथा, पटकथा, संवाद - एस. शंकर आणि बी. जयमोहन

संगीत - ए. आर. रहमान 

कलाकार - रजनीकांत, अक्षयकुमार, अॅमी जॅक्सन, आदिल हुसेन, के. गणेश, अनंत महादेवन, संचना नटराजनहेही वाचा - 

निक-प्रियंका सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी!
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा