Advertisement

सलमान खानच्या 'राधे'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

सुपरस्टार सलमान खान स्टारर ‘राधे : यू आर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला.

सलमान खानच्या 'राधे'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
SHARES

सुपरस्टार सलमान खान स्टारर ‘राधे : यू आर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला. या अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपटाद्वारे सलमान खान तब्बल दीड वर्षानंतर सिल्व्हर स्क्रिनवर परत येत आहे. २० डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झालेल्या 'दबंग 3' या चित्रपटात तो अखेरचा मोठ्या पडद्यावर दिसला होता.

प्रभुदेवा दिग्दर्शित 'राधे हा चित्रपट येत्या १३ मे रोजी थिएटरसह 'पे-पर-व्ह्यू'अंतर्गत झीप्लेक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. चित्रपटात सलमान खान स्पेशल कॉप राधेच्या भूमिकेत दिसणार आहे. अगदी 'वाँटेड' (२००९) चित्रपटातील भूमिकेसारखीच त्याची भूमिका आहे.

मुंबईत सुरू असलेला अमली पदार्थांचा व्यापार आणि गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रित करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे. राधेची काम करण्याची स्वतःची एक वेगळी शैली आहे. ट्रेलरमध्ये सलमान 'वाँटेड'मधील गाजलेला डायलॉग 'एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो अपनी आपकी भी नहीं सुनता' म्हणताना दिसला आहे.

अ‍ॅक्शननं परिपूर्ण असलेल्या ट्रेलरमध्ये सलमान गुन्हेगारांना सळो की पळो करताना दिसतोय. तर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत अभिनेत्री दिशा पाटनी आहे. रणदीप हूडा या चित्रपटाचा मुख्य खलनायक आहे. गोविंद नामदेव आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत.

सलमान खानने काही दिवसांपूर्वी १३ मार्च ही प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर केली होती. सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना तो म्हणाला होता, ""ईद का कमिटमेंट था, ईद पर ही आएंगे, क्योंकि एक बार जो मैंने..."

झी स्टुडिओचे शरद पटेल म्हणाले, "कोरोनाच्या काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही हा चित्रपट झीप्लेक्सवर रिलीज करत आहोत. सोबतच ४० ओव्हरसीज मार्केट जिथे जिथे थिएटर सुरू आहेत, तिथेही चित्रपट रिलीज होणार आहे. जर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित केला नाही, तर ती सलमानच्या चाहत्यांची फसवणूक केल्यासारखे असेल. आम्हालाही सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आम्ही तो झीप्लेक्सवरही रिलीज करत आहोत. जेणेकरुन चाहते घरबसल्याही चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील."

'झी 5' इंडियाचे सीईओ मनीष कालरा म्हणाले की, "आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल खूप उत्सुक आहोत. हा बहुभाषिक चित्रपट आहे. हा वर्षाचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर आहे. सलमानसोबत या चित्रपटाचा करार करून आनंद झाला आहे."

चित्रपट ४० ओव्हरसीज देशातील थिएटरमध्ये रिलीज होईल. यात मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, युरोपचा समावेश आहे. इंग्लडमध्ये गेल्या वर्षीपासून लॉकडाउननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट असेल.



हेही वाचा

टीव्ही कलाकार हिना खानच्या वडिलांचं निधन

अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे निधन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा