Advertisement

अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे निधन

किशोर नांदलस्कर यांनी वास्तव सिनेमात दीड फुट्याच्या बापाची साकरलेली भूमिका असो, वा गोविंदाच्या जिस देश में गंगा रहता है मधील ‘सन्नाटा’ असो, या भूमिका गाजवल्या.

अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे निधन
SHARES

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन झालं आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी गाजवलेल्या या अभिनेत्याला कोरोनाने ग्रासलं होतं. दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दुपारी ठाणे इथं अखेरचा श्वास घेतला.

किशोर नांदलस्कर यांनी सुमारे ४० नाटकं, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केलं आहे. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

किशोर नांदलस्कर यांनी वास्तव सिनेमात दीड फुट्याच्या बापाची साकरलेली भूमिका असो, वा गोविंदाच्या जिस देश में गंगा रहता है मधील ‘सन्नाटा’ असो, या भूमिका गाजवल्या.

किशोर नांदलस्कर हे पूर्वी मुंबईतील भोईवाडा-परळ इथं राहात होते. मुंबईतील घर छोटं असल्यामुळे ते मंदिरात झोपायचे. याबाबतचं वृत्त दैनिक सकाळमध्ये आल्यानंतर, तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना घर मंजूर केलं होतं. त्यांना बोरिवलीत चांगलं घर मिळालं होतं.

किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्यांच्या वडिलांनी त्याकाळी नाटकांमधून स्त्री भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे घरातच अभिनयाचे संस्कार किशोर यांच्यावर झाले.

६० च्या सुमारास रंगभूमीवर सादर झालेल्या ‘आमराई’ या नाटकात किशोर नांदलस्कर यांनी पहिल्यांदा अभिनय केला. दरम्यान त्यांनी एका कंपनीत काही वर्षे नोकरीदेखील केली. नोकरी करत त्यांनी आपली आवडही जोपासली. ८० च्या दशकात त्यांनी दुरदर्शनवर गजरा, नाटक आणि अन्य कार्यक्रमांमधून आपला सहभाग नोंदवला.

‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘नाना करते प्यार’ ही त्यांची नावाजलेली नाटकं आहेत. तर महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘जान जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांमधून नांदलस्कर प्रेक्षकांच्या भेटीला आले.

किशोर नांदलस्कर गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. त्यांना हृदयविकार, मधुमेहाचा त्रास होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. ‘पेसमेकर’ बसवला गेला होता. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी काम करणं कमी केलं होतं.



हेही वाचा

“राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, तेजस्विनीनं व्यक्त केला संताप

तारक मेहताच्या सेटवर कोरोनाचा उद्रेक, आणखी ४ कलाकार पॉझिटिव्ह

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा