Advertisement

शेखर नाईक यांच्या ‘लिब्रेट मी’ला आऊटस्टँडींग अॅचिव्हमेंट अॅवॅार्ड!

दिग्दर्शक शेखर नाईक यांच्या ‘लिब्रेट मी’ या माहितीपटाने कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘आऊटस्टँडींग अॅचिव्हमेंट अॅवॅार्ड’ पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

शेखर नाईक यांच्या ‘लिब्रेट मी’ला आऊटस्टँडींग अॅचिव्हमेंट अॅवॅार्ड!
SHARES

मराठी भाषेतील चित्रपटांसोबत लघुपट आणि माहितीपटही देश-विदेशांमधील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत असतात. दिग्दर्शक शेखर नाईक यांच्या ‘लिब्रेट मी’ या माहितीपटाने कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘आऊटस्टँडींग अॅचिव्हमेंट अॅवॅार्ड’ पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यापूर्वी 'नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' २०१८ आणि 'पुणे शॅार्टफिल्म फेस्टिव्हल' २०१८ या सिनेमहोत्सवांमध्येही ‘लिब्रेट मी’वर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.
कशावर आधारीत?

नाईक यांची ‘लिब्रेट मी’ ही डॅाक्युमेंट्री इंग्रजी भाषेत असून, भारतातील पवित्र नद्यांमध्ये अग्रस्थानी असलेल्या गंगेवर आधारित आहे. जवळजवळ १० मिनिटांच्या डॅाक्युमेंट्रीमध्ये नाईक यांनी एका सुरेख संकल्पनेद्वारे सुरुवातीला गंगेची पूजा-अर्चा आणि पावित्र्य दाखवलं आहे. साधू-महंतांची ध्यानसाधना, गंगेची आरती असा प्रवास करत ही डॅाक्युमेंट्री जेव्हा गंगेतील वास्तवाचं दर्शन घडवते, तेव्हा अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहात नाही. काहीशा काव्यत्मक शैलीत या डाॅक्युमेंट्रीची मांडणी करण्यात आली असली तरी भयाण वास्तव दाखवताना गंगा आपल्याला काय सांगते आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गंगा स्वच्छता अभियान

सरकारकडून जरी गंगा स्वच्छता अभियानाची घोषणा करण्यात आली असली तरी गंगेचं पावित्र्य अबाधित राखण्यासाठी ही मोहीम राबवणं का गरजेचं आहे, हे नाईक यांनी ‘लिब्रेट मी’च्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या पवित्र गंगेचं पाणी तीर्थ म्हणून भारतातील घराघरात पूजलं जातं, त्या गंगेच्या प्रवाहात माणसांची प्रेतं सोडली जातात हे कटू सत्य मन उद्विग्न करणारं आहे. परंपरेच्या नावाखाली गंगेला अपवित्र करण्याचं हे काम वेळीच थांबलं नाही, तर भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होईल, असे संकेतच नाईक यांनी ‘लिब्रेट मी’च्या माध्यामतून दिले आहेत.
कुणाचा सहभाग?

‘लिब्रेट मी’ची संकल्पना दिग्दर्शक शेखर नाईक यांचीच असून, दिग्दर्शनासोबत छायांकनही त्यांनीच केलं आहे. राजू सुतार यांनी याचं काव्यात्मक लेखन केलं आहे. केदार दिवेकर यांनी संगीत दिलं असून, संतोष गोठस्कर यांनी संकलन केलं आहे. धनंजय साठे यांनी या माहितीपटाचं साऊंड डिझाइनचं काम केलं आहे. स्वप्ना पाटस्कर यांचा व्हॅाइस ओव्हर याला लाभला आहे. शेखर नाईक प्रॅाडक्शन अंतर्गत या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. https://youtu.be/gFlG8lQINIs ही या माहितीपटाची लिंक आहे. नाईक यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये वाराणसी येथे वास्तव्य करून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन ‘लिब्रेट मी’चं चित्रीकरण केलं आहे.


हेही वाचा-

अजय देवगणच्या ‘तानाजी’च्या शूटिंगचा शुभारंभ

बाळासाहेब आणि ‘मी शिवाजी पार्क’संबंधित विषय
Advertisement