Advertisement

यंदाचं वर्ष आयपीओचं, आतापर्यंत ३० कंपन्यांचा सेबीकडं अर्ज

शेअर बाजारातील तेजीचा लाभ घेऊन भांडवल उभारणीसाठी अनेक कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाईची संधी असणार आहे.

यंदाचं वर्ष आयपीओचं, आतापर्यंत ३० कंपन्यांचा सेबीकडं अर्ज
SHARES

देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने वाढली आहे. मात्र, अशा परिस्थितीत आयपीओमधून भांडवल गोळा करण्यासाठी अनेक कंपन्या इच्छुक आहेत. या वर्षात म्हणजे जानेवारीपासून आतापर्यंत ३० कंपन्यांनी आयपीओ (प्राथमिक समभाग विक्री) साठी डीआरएचपी (ड्राफ्ट रेड हियरिंग प्रॉस्पेक्टस) म्हणजे अर्ज सेबीकडे सादर केला आहे. एप्रिलमध्ये सर्वाधिक अर्ज सादर झाले आहेत.  

शेअर बाजारात यंदाचं वर्ष आयपीओचं असणार आहे. शेअर बाजारातील तेजीचा लाभ घेऊन भांडवल उभारणीसाठी अनेक कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाईची संधी असणार आहे. सेबीच्या आकडेवारीनुसार, जानेवारीत २ कंपन्यांनी आयपीओसाठी डीआरएचपी दाखल केली. यानंतर फेब्रुवारी महिन्यात ११ कंपन्यांनी तर मार्चमध्ये ६ कंपन्यांनी आणि एप्रिलमध्ये ९ कंपन्यांनी आयपीओसाठी सेबीकडे अर्ज केला आहे. 

जानेवारीमध्ये आधार हाउसिंग फायनान्स आणि नजारा टेक यांनी डीआरएचपी दाखल केले. तर फेब्रुवारीमध्ये सनराईज स्मॉल फायनान्स बँक आणि लोढा डेव्हलपर्स यांनी आयपीओसाठी अर्ज दाखल केले.  आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये ६ कंपन्यांमध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स, पारस डिफेन्सने आयपीओ आणण्यासाठी रुची दाखवली. एप्रिलबद्दल झोमाटो, आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड, ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस आदी कंपन्यांनी तर मे महिन्यात पहिल्या आठवड्यात केमप्लास्ट आणि नुवोको विस्टास यांनी अर्ज दाखल केले आहेत. 

झोमॅटो आणि बिर्ला म्युच्युअल फंडचे आयपीओ मोठे असतील. झोमॅटो आयपीओमधून ८२५० कोटी रुपये तर बिर्ला म्युच्युअल फंड ६००० कोटी रुपये उभारणार आहे. दरम्यान, आतापर्यंत लोढा डेव्हलपर्स, सनराईज स्मॉल फायनान्स आदी कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ८ कंपन्यांनी आयपीओमधून १२,७२० कोटी रुपये जमा केले आहेत.

कोरोनामुळे २०२० मध्ये शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. या वर्षात १६ आयपीओ आले. यातून कंपन्यांनी ३१ हजार कोटी रुपये उभारले. त्यातील १५ आयपीओ दुसऱ्या सहामाहीत आले.  केवळ एसबीआय कार्डचा आयपीओ पहिल्या सहामाहीत दाखल झाला होता. 

या वर्षी बड्या कंपन्या आयपीओ आणत आहेत. आयपीओमधून २ लाख कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. शेअर बाजार तेजीत आहे आणि परदेशी गुंतवणूकदार सतत पैसे गुंतवत आहेत. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांचे निकालही चांगले आहेत. कोरोना लस आल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आयपीओमधून भांडवल उभारण्याची तयारी सुरू केली आहे. 



हेही वाचा -

पीएफमधील ५ लाखांवरील गुंतवणुकीच्या व्याजावर लागणार कर

आयकर विभाग जूनमध्ये लाँच करणार नवे ई-फाइलिंग पोर्टल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा