Advertisement

रेल्वे, एमआयडीसीत ६०० कोटींचा करार


रेल्वे, एमआयडीसीत ६०० कोटींचा करार
SHARES

वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावरील 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स' २०१८ या जागतिक गुंतवणूक परिषदेचा मंगळवारी समारोप झाला. या वेळी मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत एमआयडीसी आणि रेल्वेत लातूरमध्ये रेल्वे तसेच मेट्रोसाठी डबे उभारणीच्या कारखान्यासाठी ६०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. या कराराअंतर्गत १५ हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.


रेल्वे कोचनिर्मिती कारखाना

रेल्वेसोबत झालेल्या ६०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे लातूर इथं जवळपास ३५० एकर जागेवर रेल्वे कोचनिर्मिती कारखाना पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या भागात १५ हजार जणांना थेट रोजगार मिळणार आहे. तर त्याच्या तिप्पट अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प एकूण २ हजार हेक्टर जागेवर तयार करण्यात येत आहे. तेथे मेट्रो कोचनिर्मिती होणार आहे. मेट्रोचे हे डब्बे देशाबरोबरच जागतिक स्तरावर देखील पाठवण्यात येतील.

या प्रकल्पामुळे लातूर, बीड, उस्मानाबाद, या जिल्ह्यांना फायदा मिळणार आहे. मराठवाडा भागात गेल्या अनेक वर्षांत कुठलाही मोठा प्रकल्प आला नव्हता. रेल्वेसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीला चालना मिळेल.


'सहभाग' वेबपोर्टलचं उद्घाटन

रिलायन्स उद्योग समूहाबरोबर ६० हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या तसंच राज्य शासन आणि भारतीय रेल्वे समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 'सहभाग' या वेबपोर्टलचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेबपोर्टलच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) वापर सामाजिक विकासासाठी करण्यासाठी करण्यात येणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


काय म्हणाले गोयल?

महाराष्ट्र हे देशाचं 'ग्रोथ इंजिन' आहे. केंद्र शासनाने २००९ ते २०१४ या ५ वर्षांत ५ हजार ८५७ कोटी रुपये रेल्वे विकासासाठी महाराष्ट्रात गुंतवले होते. मात्र, त्यानंतर आतापर्यंत २४ हजार ४०० कोटी रुपये महाराष्ट्रासाठी देण्यात आले आहेत. लातूरमध्ये सुरु होणारा रेल्वे कोचनिर्मिती कारखाना एका बैठकीत मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी लागणारी जमीन देखील तातडीने हस्तांतरित करण्यात आली. या ठिकाणी निर्माण होणारे मेट्रोचे कोच देशातच नव्हे, तर जागतिकस्तरावर पाठवण्यात येतील. मेट्रोच्या कोचला ५० टक्के मागणी ही केवळ महाराष्ट्रातूनच होते, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं.


३६ लाख रोजगारनिर्मिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, "मॅग्नेटिक महाराष्ट्राला प्रचंड यश मिळालं आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

आतापर्यंत या परिषदेत ४ हजार १०६ सामंजस्य करार झाले आहेत. त्या माध्यमातून ३ लाख ९० हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून ३६ लाख ७७ हजार १८५ जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यापैकी राज्यातील अविकसित भागात होणाऱ्या १२ लाख १० हजार ४६४ कोटींच्या गुंतवणुकीमुळे २ लाख ६ हजार २६६ रोजगार निर्मिती होणार आहे.

त्यामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक उद्योग क्षेत्रात (५ लाख ४८हजार १६६ कोटी) होणार असून गृहनिर्माण क्षेत्रात ३ लाख ८५ हजार, तर ऊर्जा क्षेत्रात १ लाख ६० हजार २६८ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून संरक्षण आणि हवाई उद्योगासाठी १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.”

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा