श्रीमंतांच्या जागतिक यादीत मुकेश अंबानी १० व्या स्थानावर

हुरून या कंपनीने जाहीर केलेल्या जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी १० व्या क्रमांकावर असले तरी ते भारतातील श्रीमंतांमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या भावात झालेल्या मोठ्या वाढीमुळे अंंबानी यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

SHARE

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा जगातील १० सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समावेश झाला आहे. मुकेश अंबानी ३.८३ लाख कोटी रुपयांच्या (५४ अब्ज डाॅलर) संपत्तीसह या यादीत १० व्या स्थानावर आहेत. त्यांचे लहान भाऊ अनिल अंबानी यांना मात्र श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवता आलेलं नाही. अनिल अंबानी यांच्या संपत्तीत ६५ टक्क्यांची घट झाली आहे.  


भारतातील सर्वाधिक श्रीमंत

हुरून या कंपनीने जाहीर केलेल्या जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी १० व्या क्रमांकावर असले तरी ते भारतातील श्रीमंतांमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या भावात झालेल्या मोठ्या वाढीमुळे अंंबानी यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.  रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य ८ लाख कोटी रुपयांच्या वर गेलं आहे. मुकेश अंबानी यांच्याजवळ रिलायन्स इंडस्ट्रीजची ५२ टक्के हिस्सेदारी आहे. 


संपत्ती घटली 

अनिल अंबानी यांना मागील ७ वर्षात तब्बल ५ अब्ज डाॅलरचं नुकसान झालं आहे. या वर्षी त्यांची संपत्ती १.९ अब्ज डाॅलरची राहिली आहे. हुरूनने आपल्या अहवालात म्हटलं की, कुटुंबाच्या संपत्तीचं वाटप झाल्यानंतर समान आर्थिक परिस्थितीसह व्यवसायाची सुरूवात केलेल्या मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मागील ७ वर्षात ३० अब्ज डाॅलरची वाढ झाली आहे. तर अनिल अंबानी यांच्या संपत्तीत ५ अब्ज डाॅलरपेक्षा अधिक घट झाली आहे. 


हिंदुजा दुसऱ्या स्थानावर

हुरूनच्या अहवालानुसार, भारतातील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एसपी हिंदुजा २१ अब्ज डाॅलरच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर विप्रोचे अध्यक्ष अजीम प्रेमजी आहेत. प्रेमजी यांची संपत्ती १७ अब्ज डाॅलर आहे. या यादीत पूनावाला समूहाचे अध्यक्ष सायरस एस पूनावाला १३ अब्ज डाॅलरच्या संपत्तीसह ४ थ्या स्थानावर तर आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी निवास मित्तल ५ व्या क्रमांकांवर आहेत. यानंतर कोटक महिंद्राचे उदय कोटक (११ अब्ज डाॅलर), गौतम अदाणी (९.९ अब्ज डाॅलर) आणि सन फार्माचे दिलीप संघवी (९.५ अब्ज डाॅलर) यांचा समावेश आहे. सायरस पालनजी मिस्त्री आणि शापूरजी पालनजी मिस्त्री देशातील श्रीमंतांमध्ये अनुक्रमे ९ व्या आणि १० व्या स्थानावर आहेत. 


महिला श्रीमंतांचीही यादी

हुरूनने भारतातील महिला श्रीमंतांचीही यादी जाहीर केली आहे. यादीनुसार, गोदरेज परिवाराच्या तिसऱ्या पिढीच्या उत्तराधिकारी स्मिता कृष्णा महिला अब्जाधिशांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. तर बायोकाॅनच्या किरण मुजूमदार शॉ साडेतीन अब्ज डाॅलरच्या संपत्तीसह यादीत आहेत. 


जेफ बेजोस सर्वाधिक श्रीमंत

अमेझाॅनचे प्रमुख जेफ बेजोस सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स ९६ अब्ज डाॅलरच्या संपत्तीसह दुसऱ्या, ८८ अब्ज डाॅलरच्या संपत्तीसह बर्कशायर हाथवेचे अध्यक्ष वाॅरेन बफे तिसऱ्या, ८६ अब्ज डाॅलरसह एलवीएमएचचे बर्नार्ड अर्नाल्ट चौथ्या आणि फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग ८० अब्ज डाॅलरच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या