Advertisement

३१ मार्चपर्यंत करा 'ही' १० महत्वाची कामं, अन्यथा खिशाला पडेल मोठा भुर्दंड

कर वाचविण्यासाठी गुंतवणूक आणि आधार-पॅन लिंक देण्याची अनेक महत्त्वपूर्ण कामे या महिन्यात करावी लागणार आहेत. आम्ही तुम्हाला अशा १० गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्या तुम्हाला ३१ मार्चपर्यंत कराव्या लागतील.

३१ मार्चपर्यंत करा 'ही' १० महत्वाची कामं, अन्यथा खिशाला पडेल मोठा भुर्दंड
SHARES

आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने मार्च महिना खूप महत्वाचा आहे. कर आणि इतर योजनांचा लाभ घेण्याची ३१ मार्च शेवटची तारीख आहे. जर तुम्ही घर घेतलं असेल तर त्याचा फायदा घेण्याची एक योजना आता बंद होणार आहे.   प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनुदान आता अवघे काहीच दिवस मिळणार आहे. ही योजना ३१ मार्च रोजी संपणार आहे.

तसंच कर वाचविण्यासाठी गुंतवणूक आणि आधार-पॅन लिंक देण्याची अनेक महत्त्वपूर्ण कामे या महिन्यात करावी लागणार आहेत. आम्ही तुम्हाला अशा १० गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्या तुम्हाला ३१ मार्चपर्यंत कराव्या लागतील.

१) आयकर सूट मिळविण्यासाठी गुंतवणूक

जर आपण आयकर सूटीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर आपल्याला ३१ मार्चपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. प्राप्तिकर कायद्याच्या विविध कलमांतर्गत केलेल्या गुंतवणूकींवरील करात सूट मिळू शकते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीवर करात सूट घेतली जाऊ शकते.

२) आयटीआर भरा  

वर्ष २०१९-२० साठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्याची मूळ मुदत संपल्यानंतर नंतही रिटर्न भरता येतो. मात्र यासाठी करदात्यास दंड भरावा लागेल. मूळ रिटर्न भरताना एखादी चूक झाल्यावर सुधारित रिटर्न्स दाखल केले जातात. आता ३१ मार्च आधी १० हजार रुपयांच्या दंडासहीत आयटीआर जमा करायचा आहे.

३) आधार-पॅन लिंक करा

पॅन कार्ड आधार कार्डशी जोडण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. याआधी आधार-पॅन लिंक करण्यासाठी आयकर विभागाने अनेकदा शेवटची तारीख वाढवली आहे. मात्र, या वेळी जर शेवटची तारीख वाढविली नाही तर ज्यांनी पॅन आधारशी जोडले  नाही त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ३१ मार्चपर्यंत  पॅन आधारमध्ये जोडले नाही तर ते अवैध होईल. 

४) प्रधानमंत्री आवास योजनेत अर्ज करा

पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) ही योजना लोकांना स्वस्त दरात घरे उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारने सुरू केली आहे. ३१ मार्चपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेंतर्गत प्रथमच घर विकत घेणाऱ्यांना २.६७ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. 

५)  विवाद से विश्वास योजनेचा लाभ घ्या

प्राप्तिकर विभागामार्फत कर संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी ‘विवाद से विश्वास’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विवरण देण्याची अंतिम तारीख ३१ मार्च  आहे. तर फी जमा करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल केली आहे. प्राप्तिकराच्या प्रलंबित तक्रारीचं निराकरण करणं हा या योजनेचा उद्देश आहे.

६) विशेष उत्सव आगाऊ योजनेचा लाभ घ्या

विशेष उत्सव अ‍ॅडव्हान्स योजनेंतर्गत सरकारने आपल्या कर्मचार्‍यांना १०,००० रुपये व्याजमुक्त अ‍ॅडव्हान्स जाहीर केले होते. या योजनेचा फायदा घेण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचार्‍यांना रूपे प्री-पेड कार्ड मिळेल. हे आधीपासून रिचार्ज केलेले असेल. यामध्ये १० हजार रुपये मिळतील. तसंच, यावरील सर्व बँक शुल्कही सरकार उचलेल. कर्मचारी १० महिन्यांत आगाऊ घेतलेली रक्कम परत करू शकतात.

७) एलटीसी कॅश व्हाउचर योजनेचा फायदा

कोरोनामुळे लोक चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवास करू शकले नाहीत. म्हणूनच सरकारने विशेष रजा प्रवास सवलत (एलटीसी) रोख व्हाउचर योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत  १२ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करून एलटीसीचा लाभ घेऊ शकतात. मात्र,अट अशी आहे की,  वस्तूंवर किमान १२ टक्के जीएसटी दिला असेल आणि डिजिटल पद्धतीने पेमेंट केले असेल. 

८) पीएम किसान योजनेत नोंदणी

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत ७ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. ज्यांना आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केलेली नसेल त्यांना ३१ मार्चपर्यंत नोंदणी करता येईल. त्यांचा अर्ज स्वीकारल्यास होळीनंतर त्यांना २००० रुपये मिळतील. तसंच एप्रिल किंवा मेमध्ये २ हजार रुपयांचा दुसरा हप्ता मिळेल. मिळतील. या योजनेंतर्गत सरकार दोन हजाराच्या तीन हप्त्यांमध्ये वार्षिक ६००० रुपये देते

९) जीएसटी रिटर्न भरा

सरकारने आर्थिक वर्ष २०१९-२० साठी जीएसटी रिटर्न भरण्यासाठी अंतिम मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढविली होती. शेवटच्या तारखेनंतर रिटर्न भरल्यानंतर तुम्हाला २०० रुपये दंड भरावा लागेल.

१०) आपत्कालीन क्रेडिट लाइन हमी योजनेंतर्गत कर्ज

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) फायदा व्हावा यासाठी सरकारने आपत्कालीन क्रेडिट लाइन गॅरंटी योजना (ईसीएलजीएस) सुरू केली. कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेल्या एमएसएमई कंपन्यांना आर्थिक मदत देणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. या योजनेसाठी सरकारने तीन लाख कोटी रुपये राखून ठेवले आहेत. ही योजना यावर्षी ३१ मार्चपर्यंत सुरू राहील.



हेही वाचा - 

१ एप्रिलपासून प्राप्तिकर संबंधित ५ नियमात बदल, त्याचा परिणाम तुमच्या खिशावरही होणार

तुम्हाला कर भरावा लागत नसेल तरी भरा आयटीआर, मिळतील 'हे' फायदे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा