Advertisement

पीपीएफ : सरकारी हमीचा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय

अनेक गुंतवणूकदारांना पीपीएफची माहिती नसते. हे पीपीएफ खातं कुठं उघडायचं, किती रक्कम गुंतवता येते, कधी पैसे काढायचे, पीपीएफचे फायदे काय याची माहिती आपण घेणार आहोत.

पीपीएफ : सरकारी हमीचा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय
SHARES

गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून पब्लिक प्रॉव्हिडंड फंड (पीपीएफ) कडे पाहिलं जातं. पैसे परत मिळण्यासाठी केंद्र सरकारची हमी असल्याने गुंतवणूक पर्यायांमधील हा सगळ्यात सुरक्षित पर्याय मानला जातो. मात्र,अनेक गुंतवणूकदारांना पीपीएफची माहिती नसते. हे पीपीएफ खातं कुठं उघडायचं, किती रक्कम गुंतवता येते, कधी पैसे काढायचे, पीपीएफचे फायदे काय याची माहिती आपण घेणार आहोत.

ही एक बचत ठेव योजना आहे. सरकारने १९६८ मध्ये पीपीएफ योजना सुरू केली. या योजनेत आपण पैसे बचत म्हणून सरकारकडे जमा करतो. योजनेचा कालावधी संपल्यावर सरकार आपले पैसे व्याजासहीत देते. कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत आणि पोस्ट आॅफिसमध्ये पीपीएफ खाते उघडता येते. सध्या पीपीएफवर ७.९ टक्के व्याजदर मिळत आहे. या खात्यात तुम्ही कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त  १.५ लाख रुपये एक वर्षाच्या कालावधीत जमा करु शकतात. स्वत:च्या नावावर किंवा तुमच्या मुलांच्या नावावर सुद्धा पीपीएफ खातं सुरू करता येते.


खाते उघडण्याची प्रक्रिया

बँकेत किंवा पोस्ट आॅफिसमध्ये पीपीएफ खाते उघडता येते. एका व्यक्तीला एकच खातं उघडता येते.पीपीएफचे संयुक्त खाते उघडता येत नाही. अनिवासी भारतीय व्यक्ती पीपीएफचे खाते उघडू शकत नाही. मात्र खाते सुरु असलेल व्यक्तीने अनिवासी भारतीय असा दर्जा प्राप्त केल्यास खात्याची मुदत संपेपर्यंत ते चालू राहते. खाते उघडताना कमीत कमी शंभर रुपये भरावे लागतात. ते रोख किंवा धनादेशाद्वारे भरता येतात. खातं उघडल्यानंतर बँकेकडून तुम्हाला पासबुक मिळते. खात्यात एकूण किती रक्कम आहे, व्याज किती मिळाले त्याचा तपशील पासबुकमध्ये वेऴोवेळी भरला जातो. एक व्यक्ती केवळ एकच पीपीएफ अकाऊंट सुरू करु शकतो. एखाद्या व्यक्तीचं बँकेत पीपीएफ खातं असल्यास तिला पोस्ट ऑफिसमध्ये दुसरं खातं उघडता येत नाही. तर ज्या व्यक्तीचं पीपीएफ खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे ती व्यक्ती बँकेत दुसरं खातं सुरू करु शकत नाही.


पीपीएफची वैशिष्ट्ये

कालावधी 

पीपीएफ खात्याचा कालावधी १५ वर्षांचा असतो.  त्यानंतर हा कालावधी कितीही वेळा वढवता येतो. मात्र, तो फक्त पाच वर्षांच्या टप्प्यात वाढवावा लागतो. मुदत संपल्यानंतर एक वर्षाच्या आत पुन्हा मुदत वाढवून घ्यावी लागते

गुंतवणूक मर्यादा 

पीपीएफ खात्यात दरवर्षी किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरता येतात. या खात्यात वर्षात १२ वेळा पैसे भरता येतात. खाते चालू ठेवायचे असेल तर वर्षातून एकदा तरी पैसे भरावे लागतात.

कर्ज मिळते

पीपीएफ खाते  ३ वर्ष चालू राहिल्यास खात्यातील रकमेवर कर्जही मिळते. खात्यावर जेवढी रक्कम आहे त्याच्या २५ टक्के कर्ज मिळते. कोणत्या कारणासाठी कर्ज हवे याचा विचार करूनच तुम्हाला कर्ज दिलं जातं.

करमुक्त गुंतवणूक

पीपीएफमधील दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त आहे. पीपीएफमधील गुंतवणूक, त्यावरील व्याज आणि गुंतवणुकीतून रक्कम काढण्यावर कोणत्याही प्रकाराचा कर लागू होत नाही.

५ वर्षांनी पैसे काढू शकतो

पीपीएफमधील गुंतवणुकीची १५ वर्षांची मुदत आहे. त्यामुळे पैसे गुंतवले की एवढी वर्ष अडकून पडतात असंच सर्वांना वाटतं. मात्र, पीपीएफच्या नियमानुसार, गुंतवणूकदाराला ५० टक्के रक्कम गुंतवणुकीपूर्वी काढता येते. मात्र, त्यासाठी ५ वर्ष पूर्ण होणं आवश्यक आहे.

दर महिन्याला व्याज

 तुम्हाला दर महिन्याला तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळू शकतं. दर महिन्याचं व्याज पूर्ण मिळावं यासाठी दर महिन्याला ५ तारखेच्या आत पैसे भरावेत. दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते.हेही वाचा -

बँक येणार तुमच्या दारात, घरबसल्या मिळणार बँकिंग सुविधा

२ हजाराची नोट होणार बंद, 'हे' आहे कारण
संबंधित विषय
Advertisement