Advertisement

कर बचतीच्या टिप्स; मुलांची शैक्षणिक फी, कर्जावरही मिळेल कर सवलत

आपण आपल्या मुलाच्या शैक्षणिक शुल्क किंवा शैक्षणिक कर्जासह त्याच्यावर केलेल्या इतर खर्चावरही कर सवलत घेऊ शकता. आम्ही तुम्हाला अशाच प्रकारच्या खर्चाबद्दल किंवा मुलांवर केलेल्या गुंतवणूकीविषयी सांगणार आहोत, ज्यावर तुम्हाला कर सवलत मिळेल.

कर बचतीच्या टिप्स; मुलांची शैक्षणिक फी, कर्जावरही मिळेल कर सवलत
SHARES

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी ३१ मार्च पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न (प्राप्तिकर परतावा) भरण्याची अंतीम तारीख आहे. रिटर्न भरण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या खर्चावर आणि गुंतवणूकीवर कर सूट मिळते याची माहिती असणं आवश्यक आहे. आपण आपल्या मुलाच्या शैक्षणिक शुल्क (ट्यूशन फी) किंवा त्याच्या शैक्षणिक कर्जासह त्याच्यावर केलेल्या इतर बर्‍याच खर्चावरही कर सवलत घेऊ शकता. आम्ही तुम्हाला अशाच प्रकारच्या खर्चाबद्दल किंवा मुलांवर केलेल्या गुंतवणूकीविषयी सांगणार आहोत, ज्यावर तुम्ही कर सवलत घेऊ शकता.

१) सुकन्या समृध्दी योजना

जर तुमची मुलगी १० वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर आपण आपल्या मुलीसाठी सुकन्या समृध्दी योजनेत गुंतवणूक करून ८० सी अंतर्गत १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणूकीवर सूट मिळवू शकता. जर तुमची मुलगी १० वर्षांपेक्षा मोठी असेल किंवा मुलगा असेल तर आपण पीपीएफ किंवा यूलिपसह अशा योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता, जेथे तुम्हाला ८० सी अंतर्गत कर लाभ मिळू शकेल.

२) आरोग्य विम्यावर सवलत

मुलांच्या आरोग्य विम्याचा प्रीमियम देऊन देखील कर वाचवू शकता. यामध्ये कलम ८० डी अंतर्गत २५ हजार रुपयांपर्यंतची कर सवलत मिळेल. 

३) मुदतीचा जीवन विमा (टर्म इन्शुरन्स)

मुलांच्या टर्म इन्शुरन्ससाठी भरलेल्या प्रीमियमच्या रकमेवर आपण प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर सवलत मिळवू शकता. कलम ८० सी अंतर्गत कराचा लाभ घेण्यासाठी आपल्याला दरवर्षी नवीन पॉलिसी घेण्याची आवश्यकता नाही. पॉलिसीचे नूतनीकरण वार्षिक प्रीमियम देखील कलम ८० सी अंतर्गत कर सवलतीत पात्र आहे.

४) शैक्षणिक फी वर सवलत

दोन मुलांच्या शाळा/महाविद्यालयात भरलेल्या शैक्षणिक शुल्कावर कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. आपल्याकडे दोनपेक्षा जास्त मुले असल्यास आपण कोणत्याही दोन मुलांसाठी हा दावा करु शकता. पती आणि पत्नी या दोघांचे उत्पन्न करपात्र असेल तर पती आणि पत्नी वेगवेगळी कर सवलत या कलमानुसार घेऊ शकतात. म्हणजे एका करदात्याला चार मुले असतील तर दोन मुलांच्या फीची सवलत पती घेऊ शकतो आणि दोन मुलांच्या फीची सवलत पत्नी घेऊ  शकते. म्हणजेच एका कुटुंबात चार मुलांच्या फीची कर सवलत घेता येते. 

शाळा, कॉलेज, विद्यापीठ, किंवा इतर शैक्षणिक संस्था यांच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी भरलेल्या फीची कर सवलत मिळते. अभ्यासक्रम अर्धवेळ असेल तर सवलत मिळत नाही. फक्त शाळा, कॉलेज, विद्यापीठ, किंवा इतर शैक्षणिक संस्था यांना दिलेल्या फीची सवलत या कलमानुसार मिळते. खाजगी शिकविण्या, कोचिंग क्लासेसना भरलेल्या फीची सवलत मिळत नाही. शाळा, कॉलेज, विद्यापीठ, किंवा इतर शैक्षणिक संस्था भारतात असणेदेखील गरजेचे आहे. भारताबाहेरील संस्थांसाठी या कलमानुसार कर सवलत मिळत नाही.

५)  शैक्षणिक कर्जावरील व्याजाची सवलत

आपण आपल्या मुलांसाठी घेतलेल्या शैक्षणिक कर्जावरील  व्याजावर कलम ८० ई अंतर्गत कर सवलतीचा दावा करू शकता. कर सवलत मिळवण्यासाठी शैक्षणिक कर्ज उच्च शिक्षणासाठी घेतले असले पाहिजे. उच्च शिक्षणामध्ये उच्च-माध्यमिक किंवा तत्सम परीक्षेनंतर घेतलेल्या शिक्षणाचा समावेश होतो. हे शिक्षण भारतात किंवा भारताबाहेर घेतले असले तरी चालते. व्यावसायिक शिक्षणाचासुद्धा यामध्ये समावेश होतो.

६) उपचार खर्चावरही कर सवलत 

कलम ८० डीडीबी अंतर्गत करदात्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या गंभीर आणि दीर्घ आजारावर केलेल्या उपचार खर्चावर कर सवलत मिळते. करदात्याचे आई-वडील, पत्नी, मुले आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या भावंडांच्या उपचारावर केलेला खर्च कर सवलतीस पात्र आहे. यामध्ये कर्करोग, हिमोफिलिया, थॅलेसीमिया आणि एड्स यासारख्या आजारांचा समावेश आहे. मुलासाठी ही कपात ४० हजार रुपये आहे. यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा