वाहनांची गर्दी असलेल्या चौकात दिव्यांग, दृष्टिहिनांना रस्ता ओलांडण्यासाठी इतरांचा आधार घ्यावा लागतो. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मात्र ठाण्यातील (thane) तीन हात नाका चौकात आता दिव्यांग, दृष्टिहिनांसाठी 'ग्रीन सिग्नल' (green signal) यंत्रणा ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.
या ठिकाणी एकूण 7 रस्ते एकत्र येत असल्याने वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे या चौकाचा प्रत्यक्ष अभ्यास व सर्वेक्षण करून ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष रॅम्प, बीपर यंत्रणेने दिव्यांगांसह दृष्टीहिनांना रस्ता ओलांडणे सुलभ होणार आहे.
ठाण्यात तीन हात नाका, नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शन, कापूरबावडी-माजिवडा अशा मुख्य चौकात एकाचवेळी अनेक रस्त्यांवर वाहने येतात. असे लहानमोठे चौक व सिग्नल शहरांतील विविध भागांत आहेत.
याठिकाणी एखाद्या डोळस व्यक्तीलाही रस्ता ओलांडताना अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे दृष्टिहीन व्यक्तींची अवस्था रस्ता ओलांडताना बिकट होत असल्याने ठाण्यात 'ग्रीन सिग्नल' यंत्रणा राबवण्याचा निर्णय ठाणे महापालिका (thane municipal corporation) आणि वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला होता.
या अभियानाचा एक भाग म्हणून रस्त्यांवरील चौकाच्या ठिकाणी पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा याकरीता ग्रीन सिग्नल व्यवस्था तयार करणे, मुख्यत्वे दृष्टीहीन आणि दिव्यांगांना सिग्नलवर रस्ता ओलांडणे सुलभ, सुरक्षित व्हावे, याबाबत ठाणे वाहतूक शाखेचे माजी पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी ही संकल्पना तत्कालीन ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे मांडली होती.
त्या अनुषंगाने शहर वाहतूक विभागामार्फत अशा प्रकारचे काम करणाऱ्या विविध सेवाभावी संस्था यांच्यामार्फत प्रत्यक्ष जागेचे सर्वेक्षण करून दरपत्रके प्राप्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
तब्बल दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. दिव्यांगांनी सुरक्षितरित्या रस्ता ओलांडून यंत्रणेला सुरुवात केली.
हेही वाचा