Advertisement

तुंबणाऱ्या पाण्याची कायमची विल्हेवाट: सहा हजार बांधकामे होणार बाधित


तुंबणाऱ्या पाण्याची कायमची विल्हेवाट: सहा हजार बांधकामे होणार बाधित
SHARES

मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये तुंबणाऱ्या पाण्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो. आता अशा तुंबणाऱ्या १०५ ठिकाणांची कायमस्वरुपी मलमपट्टीच केली जाणार आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत या सर्व १०५ ठिकाणांची कामं महापालिका हाती घेणार आहे. यामध्ये एकूण ६ हजार २०८ बांधकामं बाधित होणार आहे.


महापालिका आयुक्तांचे आदेश

मुंबईतील १०५ ठिकाणी पावसाच्या पाण्याचा जलदगतीने निचरा होण्याच्या दृष्टीने येत्या ऑक्टोबरपासून उपायोजनाविषयक कामं सुरू करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून १६ कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. तर ६१ निविदांची प्रक्रिया सध्या सुरू असून या कामांचे कार्यादेश देखील सप्टेंबर अखेरपर्यंत द्यावे. या ७७ निविदांशी संबंधित १०५ ठिकाणांची कामंही येत्या ऑक्टोबरपासून सुरू करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी पार पडलेल्या मासिक आढावा बैठकीत दिले.


उपाययोजना राबवल्या

पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे व्हावा, यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मागील वर्षी पावसाळ्यात २२५ ठिकाणी पाणी साचत असल्याचं आढळून आलं होतं. या सर्व ठिकाणी पाणी साचण्यामागील कारणांच्या मुळाशी जाऊन सखोल अभियांत्रिकीय अभ्यास करण्यात आला. त्या आधारे निश्चित करण्यात आलेल्या विविध उपाययोजना अशा १२० ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीनं राबवण्यात आल्या आहेत.


एवढी बांधकामं होणार बाधीत

या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम यावर्षीच्या पावसाळ्यात दिसून आला. यातल्या बहुतांश ठिकाणी पाण्याचा निचरा गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक गतीने आणि प्रभावीपणे होत असल्याचंही दिसून आलं. उर्वरित १०५ पैकी ५५ ठिकाणं ही शहरी भागातील असून ३३ ठिकाणं ही पूर्व उपनगरातील तर १७ ठिकाणं ही पश्चिम उपनगरातील आहेत. या उपाययोजना राबवताना शहर भागातील १,७०२; पूर्व उ़पनगरांमधील ३,१३४; तर पश्चिम उपनगरातील १,३७२; यानुसार एकूण ६ हजार २०८ एवढी बांधकामं बाधीत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा