Advertisement

मुंबईत दादर, माहीममध्येच सर्वाधिक १६५ टन निर्माल्य


मुंबईत दादर, माहीममध्येच सर्वाधिक १६५ टन निर्माल्य
SHARES

गणेशोत्सवात गणपती बाप्पाला अर्पण केलेल्या हारफुलांचं रुपांतर निर्माल्यांमध्ये होतं. हे निर्माल्य समुद्र आणि तलावांमध्ये टाकलं जावू नये, यासाठी सर्व विसर्जन स्थळांवर महापालिकेने निर्माल्य कलश बसवलं आहे. याशिवाय सर्व गणेशोत्सव मंडळांकडून दरदिवशी निर्माल्य गोळा करून त्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न महापालिका करत असून आतापर्यंत सर्वाधिक निर्माल्य हे शिवाजीपार्क, दादर, माहीमच्या जी-उत्तर प्रभागात जमा झालं आहे. या प्रभागाने आतापर्यंत १६५ टन निर्माल्य गोळा केल्याची माहिती मिळत आहे.

गणेशोत्सवात निर्माण होणाऱ्या निर्माल्य गोळा करून त्यापासून खतनिर्मिती करण्याचा उपक्रम याही वर्षी महापालिकेनं हाती घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक विभागांमध्ये खत निर्मिती प्रकल्प हाती घेत असून विभागातील निर्माल्य आणून याठिकाणी गोळा केलं जातं.


५२० मेट्रीक टन निर्माल्य गोळा

गणेशोत्सवापासून आतापर्यंत प्रमुख विभागांमध्ये सुमारे ५२० मेट्रीक टन निर्माल्य गोळा झाल्याची माहिती मिळत आहे. प्रत्येक विभागातील विसर्जनस्थळी महापालिकेतर्फे निर्माल्य कलश ठेवण्यात आलं आहे. संपूर्ण मुंबईतील २४ विभागांमध्ये २०१ निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर १९२ निर्माल्य वाहन आणि डंपरचीही व्यवस्था केली आहे. या वाहनांमधून विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये निर्माण होणारं निर्माल्य दरदिवशी गोळा केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ पैकी सुमारे १३ ते १५ विभाग कार्यालयांच्या हद्दीतून आतापर्यंत सुमारे ५०० टन निर्माल्य गोळा निर्माण झाल्याची आकडेवारी प्राप्त होत आहे. हे सर्व निर्माल्य खत निर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी जमा केलं जात आहे.


१६५ टन निर्माल्य निर्माण

आतापर्यंत सर्वाधिक निर्माल्य हे दादर, प्रभादेवी, माहीम आणि धारावी परिसर असलेल्या जी-उत्तर विभागातून निर्माण झालं आहे. या विभागातून ९ दिवसांमध्येच तब्बल १६५ टन निर्माल्य निर्माण झालं आहे. या भागांतून दीड आणि पाच दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनाच्यादिवशी सरासरी ६० ते ६५ टन निर्माल्य गोळा झालं आहे. त्याखालोखाल कुर्ला एल विभागातून आतापर्यंत ८३ टन निर्माल्य गोळा झालं आहे. तर भांडुप-कांजूर आणि ग्रँटरोड-मुंबई सेंटल या एस व डी विभागांमध्ये अनुक्रमे ७६ आणि ७३ टन निर्माल्य गोळा झालं आहे.


निर्माल्यापासून खत निर्मिती

जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आपल्या या विभागात ७ नैसर्गिक आणि १ कृत्रिम अशाप्रकारे ८ विसर्जनस्थळे आहे. त्यामुळे या भागात निर्माल्य अधिक गोळा होत असून या निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्प हा धारावीत उभारला आहे. तिथं हे निर्माल्य टाकून त्यावर खत निर्मितीची प्रक्रिया केली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


मोकळ्या जागेवर खत निर्मिती

कुर्ला एल विभागाचे सहायक आयुक्त अजित कुमार आंबी यांच्याशी संपर्क साधला असता, या भागातील निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येत असल्याचं सांगितलं. यासाठी येथील हिंदु स्मशानभूमीच्या काही मोकळ्या जागेवर खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. याठिकाणी हे निर्माल्य टाकण्यात येत असून त्यातून निर्माण होणारं खत हे येथील झाडं आणि रोपट्यांसाठी वापरलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा -

अंधेरीचं 'स्वप्नाक्षय मित्रमंडळ' गणेश गौरव स्पर्धेत अव्वल

संबंधित विषय
Advertisement