सात वर्षांपासून पत्रावाला चाळीतील 16 रहिवासी भाड्याविना

 Malad
सात वर्षांपासून पत्रावाला चाळीतील 16 रहिवासी भाड्याविना
Malad, Mumbai  -  

म्हाडाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक म्हणजे गोरेगावमधील पत्रावाला चाळ घोटाळा. म्हाडाला एक हजार कोटींचा (सरकारी अहवालानुसार 414 कोटींचा) चुना लावणाऱ्या या बिल्डरने रहिवाशांनाही देशोधडीला लावले आहे. बिल्डरविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या 16 रहिवाशांना बिल्डरने घर खाली केल्याच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सात वर्षांत एक रुपयाही भाडे दिलेले नाही. त्यामुळे या रहिवाशांना खिशातून भाडे भरत आर्थिक दंड सोसावा लागत आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे म्हाडाकडे यासंबंधी तक्रार करूनही म्हाडा लक्ष देत नसल्याने आता दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न या रहिवाशांपुढे उभा ठाकला आहे.

गोरेगावमधील पत्रावाला चाळीच्या पुनर्विकासात बिल्डरने घोटाळा केला असून, सरकारी अहवालातूनही हे सिद्ध झाले आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते नि काय कारवाई करतं, हे पाहणे महत्त्वाचे आहे. असे असताना बिल्डरने रहिवाशांचीही कशी फसवणूक केली, हे ही आता समोर येत आहे. बिल्डरविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या 16 रहिवाशांना सात वर्षांत बिल्डरने भाडे दिलेले नाही. भाड्यापोटी एका रहिवाशाची अंदाजे 30 ते 35 लाखांची थकबाकी असल्याची माहिती यातील एक रहिवाशी आणि बिल्डर विरोधात न्यायालयीन लढाई देणारे डॉ. राहुल वाघ यांनी दिली आहे. सोसायटीकडे गेलो तर सोसायटी दाद देत नाही आणि म्हाडा तक्रारींची दाखलच घेत नाही, असा आरोपही या रहिवाशाने केला आहे.

या बिल्डरने 2010 पासून घरे पाडली असून, अदयापही पुनर्विकास पूर्ण केलेला नाही. असे असताना भाडेही मिळत नसल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. दुसरीकडे अन्य काही रहिवाशांनाही गेल्या दीड-दोन वर्षांपासून भाडे दिले जात नसल्याची माहितीही समोर आली आहे. बिल्डरच्या या त्रासाला कंटाळलेल्या काही रहिवाशांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाडे मिळावे, घरांचा ताबा मिळावा ही मागणी रहिवाशांची आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे या घोटाळ्याप्रकरणी बिल्डरसह म्हाडा अधिकाऱ्यांवरही लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा या रहिवाशांची आहे.

भाडे नाकारता येत नाही
पुनर्विकासात बिल्डरला रहिवाशांना भाडे नाकारता येत नाही. घर खाली करून ताब्यात घेतले की, भाडे द्यावेच लागते. अपवाद बिल्डर आणि सोसायटीमध्ये करार काय झाला आहे, त्यावर काही गोष्टी अवलंबून असतात.
अॅड. विनोद संपत, मालमत्ता शेत्रातील तज्ज्ञ

भाडे मिळेल
काही रहिवाशांनी आमच्याकडे दाद मागितली आहे. त्यांचा हा भाड्याचा प्रश्न आम्ही लवकरच निकाली काढू. बिल्डरकडून भाडे मिळवून देऊ.
सुभाष लाखे, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडा

Loading Comments