पंधरा दिवसांत पावणेदोन लाख किलो बर्फ जप्त

  CST
  पंधरा दिवसांत पावणेदोन लाख किलो बर्फ जप्त
  मुंबई  -  

  मुंबईतील फेरीवाल्यांकडील सरासरी 75 टक्के बर्फ नमुन्यांमध्ये ई-कोलाय जीवाणू आढळून आल्यामुळे या दूषित बर्फाविरोधात महापालिकेने आपली मोहीम तीव्र केली आहे. अनधिकृत फेरीवाले, सरबत विक्रेते आणि खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावर या मोहीमेंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत मागील 15 दिवसांत 3 हजार 345 फेरीवाल्यांवर आणि 428 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. यात आतापर्यंत सुमारे 1 लाख 70 हजार 175 किलो बर्फ नष्ट करण्यात आला आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे पेयपदार्थ, अन्नपदार्थ, फळे, भाज्या, मिठाई इत्यादीही नष्ट करण्यात आले आहेत.

  मुंबई महापालिकेने 1 ते 16 जून 2017 या कालावधी दरम्यान सुमारे 1 लाख 70 हजार 175 किलो बर्फ नष्ट केला आहे. यांत सर्वाधिक 23 हजार 900 किलो बर्फ 'एम पूर्व' विभागातून नष्ट करण्यात आला आहे. त्या खालोखाल 15 हजार किलो बर्फ 'आर दक्षिण' विभागात, तर 'इ' विभागातून 12 हजार 900 किलो बर्फ नष्ट करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांनी दिली.

  या मोहिमेत 3 हजार 345 फेरीवाल्यांवर आणि 428 दुकानांवर कारवाई करण्यात आली. फेरीवाल्यांवरील या कारवाई दरम्यान महापालिकेच्या 'एल' विभागात सर्वाधिक 799 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याखालोखाल 'के पूर्व' विभागात 415; तर 'के पश्चिम' विभागात 318 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एकूण 428 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 'के पश्चिम' विभागात सर्वाधिक म्हणजे 107 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील 2 हजार 160 किलो मिठाई (Sweets), 6 हजार 498 किलो अन्नपदार्थ (Solid Food), 3 हजार 158 किलो फळे व भाज्या, 10 हजार 172 लिटर पेयपदार्थ (Liquid Food) इत्यादी देखील नष्ट करण्यात आले आहे.

  मुंबईकरांनाे काय टाळाल?
  महापालिका क्षेत्रातील बर्फ व पाणी नमुन्यांमध्ये आढळून आलेले ई-कोलाय जीवाणूंचे प्रमाण लक्षात घेता रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नये, बाहेरील पाणी, सरबत, ऊसाचा, फळांचा रस इत्यादी पिणे टाळावे, तसेच पाणीपुरी, भेळपुरी सारखे पदार्थ खाणेही टाळावे, असे आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आले आहे.

  अशी घ्यावी काळजी -
  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जेवणापूर्वी व अन्न शिजवताना, तसेच शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, घरी शिजवलेले ताजे अन्न खावे, हिरव्या पालेभाज्या, फळे स्वच्छ धुऊन खावेत तसेच वैयक्तिक स्वच्छता काटेकोरपणे राखण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मळमळ, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना डॉ. पद्मजा केसकर यांनी केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.