Advertisement

मास्कविना फिरणाऱ्या बेफिकीर नागरिकांवर पालिकेची कारवाई

मास्कचा वापर न करताच फिरणाऱ्या तब्बल १५ लाख २९ हजारांहून अधिक बेफिकीर मुंबईकरांवर महापालिकेनं दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

मास्कविना फिरणाऱ्या बेफिकीर नागरिकांवर पालिकेची कारवाई
SHARES

कोरोना व्हायरसला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं मास्क घालण्याचा व समाजिक अंतराचा वापर करण्याचे आदेश दिले होते. परंतू, अनेकजण या नियमांचं उल्लंघन करत आहेत. अशा नागरिकांवर महापालिकेनं कारवाई सुरू केली असून, मास्कचा वापर न करताच फिरणाऱ्या तब्बल १५ लाख २९ हजारांहून अधिक बेफिकीर मुंबईकरांवर महापालिकेनं दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार, आतापर्यंत दंडापोटी तब्बल ३० कोटी ९६ लाख रुपयांहून अधिक रक्कम मुंबई महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. 

दंडाचा बडगा उगारण्यात येत असला तरीही मास्कविना फिरणाऱ्या मुंबईकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, आता मास्कविना फिरणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या व्यक्तींना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसे आदेश राज्य सरकारनं दिले. मात्र मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देशही देण्यात आले.

मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यास महापालिकेनं २० एप्रिलपासून सुरुवात केली आहे. त्यासाठी महापालिकेनं पथकं सज्ज केली. सुरुवातीला मास्कविना फिरणाऱ्यांकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यात येत होता. मात्र, दंडाची रक्कम अधिक असल्यामुळं तो वसूल करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांबरोबर मुंबईकरांचा वाद होऊ लागला. अखेर दंडाची रक्कम २०० रुपये करण्यात आली.

काही भागांमध्ये दंड वसूल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला मास्क भेट स्वरूपात देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. उलटपक्षी सर्वसामान्यांसाठी मर्यादित वेळेत उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यात आल्यानंतर मुंबईतील अनेक भागांत वर्दळ वाढू लागली आहे. तसेच रेल्वे प्रवासादरम्यान, तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिक मास्कविना फिरत असल्याचं निदर्शनास येत आहे.

ही बाब लक्षात घेत महापालिकेनं मास्कविना फिरणाऱ्यांविरुद्धची मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत मुखपट्टीविना फिरणाऱ्या तब्बल १५ लाख २९ हजार ९९५ व्यक्तींवर महापालिकेनं दंडात्मक कारवाई केली आहे. या नागरिकांकडून तब्बल ३० कोटी ९६ लाख २१ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

सर्वाधिक वसुली

  • अंधेरी पश्चिम आणि आसपासच्या परिसरांत (के-पश्चिम) मास्कविना फिरणाऱ्या बेफिकीर नागरिकांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत या भागात १ लाख ८ हजार ९१२ व्यक्तींकडून तब्बल २ कोटी २१ लाख ६ हजार रुपये दंड रूपात वसूल करण्यात आला. 
  • अंधेरी पूर्व भागाचा (के-पूर्व) क्रमांक लागतो. आतापर्यंत या परिसरात ९५ हजार ९३१ व्यक्तींकडून एक कोटी ९३ लाख २६ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 
  • परळ (एफ-दक्षिण), माटुंगा (एफ-उत्तर), एल्फिन्स्टन (जी-दक्षिण) आणि दादर (जी-उत्तर) विभाग कार्यालयांचा समावेश असलेल्या पालिकेच्या ‘परिमंडळ-२’मध्ये मास्कविना फिरणाऱ्या २ लाख ७९ हजार १८८ व्यक्तींकडून ५ कोटी ६१ लाख ६८ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

परिमंडळनिहाय कारवाई

परिमंडळ
व्यक्ती
दंडाची रक्कम (रु.)
परिमंडळ-१
२,२३,२२१
४,५२,१४,७००
परिमंडळ-२
२,७९,१८८  
५,६१,६८,९००
परिमंडळ-३
२,१४,५२८
४,४१,९१,२००
परिमंडळ-४
२,३७,१०३
४,७९,६६,०००
परिमंडळ-५
१,६८,४३६
३,३९,०३,९००
परिमंडळ-६
१,९७,७२०
३,९५,८८,६००
परिमंडळ-७
२,०९,७५९
४,२५,८७,९००
एकूण
१५,२९,९५५
३०,९६,२१,२००

                                 


हेही वाचा -

महापौरांचा लोकल प्रवास, हात जोडून केली मास्क घालण्याची विनंती

मुंबईतील चार वॉर्ड पुन्हा हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा