Advertisement

महापौरांचा लोकल प्रवास, हात जोडून केली मास्क घालण्याची विनंती

मुंबईकरांमधील हलगर्जीपणावर बोट ठेवून त्यांना मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवण्याची विनंती करण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी चक्क मुंबई लोकल ट्रेनने प्रवास केला आणि प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं.

महापौरांचा लोकल प्रवास, हात जोडून केली मास्क घालण्याची विनंती
SHARES

मुंबईत कोरोना विषाणूच्या संसर्गाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबईकरांमधील हलगर्जीपणावर बोट ठेवून त्यांना मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवण्याची विनंती करण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी चक्क मुंबई लोकल ट्रेनने प्रवास केला आणि प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं.

मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंतेचीच बाब आहे. बहुतांश लोक मास्कविना लोकलमधून प्रवास करत आहेत. लोकांनी खबरदारी घ्यायला हवी, नाहीतर आपण पुन्हा एकदा लॉकडाऊनकडे जाऊ. लाॅकडाऊन लागू करायचा की, नाही? हे सर्वस्वी लोकांच्याच हातात आहे, असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली होती. 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धिम्या गतीच्या लोकलने प्रवास केला. त्याचबरोबर रेल्वे स्थानक आणि परिसरातही फेरफटका मारला. यावेळी मास्क न घालताच प्रवास करणारे तसंच इतरत्र वावरणाऱ्या नागरिकांसमोर महापौरांनी हात जोडून त्यांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं. 

हेही वाचा- नाहीतर आपण लाॅकडाऊनच्या दिशेने जाऊ- महापौर

त्यानंतर आखाती व इतर देशांमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विलगीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सांताक्रूज पूर्व येथील हॉटेल साई इनची  महापौर किशोरी पेडणेकर आणि उप महापौर अॅड. सुहास वाडकर यांनी आकस्मिक पाहणी केली असता हॉटेलमधून ४ प्रवासी पळून गेल्याचं लक्षात आलं. या ४ प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा विलगीकरणामध्ये ठेवणं तसंच हॉटेलवर व संबंधित प्रवाश्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

राज्यातील कोरोना संसर्गाची (coronavirus) लाट ओसरू लागल्यानंतर तसंच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर नागरिकांमधील बेफिकीरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सार्वजनिक ठिकाणी पुन्हा एकदा गर्दी दिसायला लागली असून बहुसंख्य नागरिक विनामास्क घराबाहेर पडत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका देखील वाढला आहे.

परिणामी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दररोज सरासरी ४०० पर्यंत आढळून येणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या फेब्रुवारीपासून वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज ५०० हून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन सर्तक झालं आहे. हीच परिस्थिती इतर शहरांत आणि ग्रामीण भागांतही दिसून येत आहे. 

नागरिकांनी सतर्कता न बाळगल्यास दंडात्मक कारवाई करण्यासोबतच पुन्हा लाॅकडाऊन लावण्याचा इशारा देखील राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

(bmc mayor kishori pednekar urges commuters to wear a mask in mumbai local train)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा