Advertisement

नवी मुंबईत ३६ इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन्स उभारणार

नवी मुंबई पालिका शहरात ‘बांधा, वापरा हस्तांतरण करा’ तत्त्वावर ३६ इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे. त्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नवी मुंबईत ३६ इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन्स उभारणार
SHARES

नवी मुंबई पालिका शहरात ‘बांधा, वापरा हस्तांतरण करा’ तत्त्वावर ३६ इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे. त्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या पाचशे बस व प्रशासनाची सर्व वाहने येत्या काळात बॅटरीवर चालणारी घेतली जाणार आहे. पालिका क्षेत्रात शून्य प्रदूषणाचं लक्ष ठेवण्यात आलं आहे.

सध्या शहरात सायकल तसेच ई बाईकचा प्रयोग राबवण्यात येत आहे. तसंच एनएमएमटी बसेसचे डिझेलवरून सीएनजीमध्ये मध्ये रूपांतर केले जाणार आहे. आता महापालिका शहरात खासगी संस्थेद्वारे ३६ इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे. अशी ३६ ठिकाणे पालिकेने तपासली आहेत. त्यामुळे शहरातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिग स्टेशन्स उभारणारी नवी मुंबई पालिका ही देशातील दुसरी पालिका ठरणार आहे.

पालिकेने यंदा पर्यावरणाला अधिक महत्त्व देताना अर्थसंकल्पात पर्यावरण पूरक तरतूद केली आहे. नवी मुंबई पालिकेने आपल्या परिवहन उपक्रमातील पाचशेच्या वर असलेली वाहने सीएनजीमध्ये परावर्तित केली आहेत. यानंतर विकत घेण्यात येणारी वाहने ही बॅटरीवर चालणारी घ्यावी असा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई शहरात सध्या परिवहन सेवेच्या बसेस डिझेलवर चालतात. डिझेलमुळे सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी केंद्र सरकार सीएनजी वाहने इलेक्ट्रिक वाहने वापरण्यासाठी जनजागृती करत असून ,राज्य शासन व त्याअंतर्गत येणाऱ्या विविध महापालिकांना अनुदान देखील देत आहे.  नवी मुंबईत सध्या ३० इलेक्ट्रिक बसेस कार्यरत आहेत. हळूहळू शंभर टक्के बसेस या सीएनजी व इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या घेण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. 

येत्या काळात आणखी १०० इलेक्ट्रिक बसेस केंद्र शासनाकडून पालिकेला मिळणार आहेत. तसेच सध्या पालिकेकडे असलेल्या डिझेलबसेसचे सीएनजीत रूपांतर केले जात आहे. पालिकेने घेतलेल्या या निर्णयाचा येत्या काळात नवी मुंबईची हवा गुणवत्ता सुधारण्यास हातभार लागणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा