SHARE

रस्ते कंत्राट कामांमधील दोषी कंत्राटदारांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू असली तरी ज्या दोषी कंत्राट कंपन्यांकडे रस्त्यांची कामे आहेत, ती अर्धवट कामे संबंधित कंत्राट कंपन्यांकडूनच पूर्ण करून घेतली जातील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिकेने हाती घेतलेली प्राधान्यक्रम 1 अंतर्गत 94 रस्ते आणि प्राधान्यक्रम 2 अंतर्गत 938 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील 448 कामे ही 15 मे पर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचा दावा महापलिका प्रशासनाने केला आहे.

मुंबईतील ‘एम/ पश्चिम’, ‘एस’ आणि ‘टी’ आदी भागांमधील रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव मंजुरीला आला असता काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी रस्त्यांचा भ्रष्टाचारातील कंत्राटदारांना कामांचे पैसे दिले जात असल्याचे सांगितले. तर प्रभाकर शिंदे यांनी दोष दायित्व असलेल्या रस्त्यांची यादी सादर करण्यात यावी अशी मागणी केली. तर रस्ते कंत्राट कामांचा अहवाल हा पुढील बैठकीत स्थायी समितीत सादर करण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. कंत्राटदारच आता दिवाळखोरीत असल्यामुळे ते कामगारांचा पगार देत नाहीत. त्यामुळे अशा कंत्राटदारांना मुदतवाढ का दिली जात आहे, असा प्रश्न मनसेचे दिलीप लांडे यांनी केला.

यावर प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी रस्ते कंत्राट कामांप्रकरणी 207 कामांमध्ये 11 कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये 558 कामे पावसाळ्यानंतर आणि 448 रस्त्यांची कामे ही पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार आहे. यातील 938 रस्त्यांची कामे ही दोष दायित्व कालावधीतील असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ही कामे हाती घेण्यात येत असली तरी ज्या भागांमधील रस्त्यांची कामे करणे गरजेचे आहे, तेथील स्थानिक नगरसेवकांनी याची यादी विभागीय सहाय्यक आयुक्तांना सादर करावी असे आवाहन दराडे यांनी केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या