Advertisement

कोस्टल रोडच्या कामांसाठी ८ हजार कोटींचं कंत्राट


कोस्टल रोडच्या कामांसाठी ८ हजार कोटींचं कंत्राट
SHARES

मुंबई महापालिकेच्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पा(कोस्टल रोड)साठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रिन्सेस स्ट्रीट ते बडोदा पॅलेसपर्यंतचं काम ‘लार्सन अँड टुब्रो’ला (एल अँड टी) आणि बडोदा पॅलेस ते वरळी-वांद्रे सागरी सेतूचं टोक या भागाचं काम हिंदुस्थान कंस्ट्रक्शन कंपनी(एचसीसी)व एचडीसी या संयुक्त कंपनीला मिळाले आहे. तब्बल आठ हजार कोटींच्या या कंत्राटाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून त्यामुळे कोस्टल रोडचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

तीन भागात विभागणी

मुंबईच्या नरीमन पॉईँट ते मालाड मार्वेपर्यंत समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून मुंबई किनारा रस्ता प्रकल्पांचे काम हाती घेतले जाणार आहे. हा भराव टाकून रस्ता बांधणे, काही भागांमध्ये पूल तर काहींमध्ये उन्नत मार्ग तर काही भागांमध्ये बोगदे अशाप्रकारे एकूण ३५.६० कि.मी लांबीच्या समुद्र किनारी मुक्त मार्गाचे काम करण्यात येणार आहे. मात्र यामधील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचे काम महापालिकेच्यावतीने केले जात आहे. यासाठी प्रकल्प सल्लागारांनी बनवलेल्या आराखडायानुसार प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी उद्यान(पॅकेज ४), प्रियदर्शनी उद्यान ते बडोदा पॅलेस(पॅकेज १), बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक(पॅकेज २) अशा तीन भागांमध्ये विभांगून या कोस्टल रोडचं काम हाती घेण्यात येत आहे.


निविदा प्रक्रिया पूर्ण

ही सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पॅकेज ४ आणि पॅकेज १साठी ‘लार्सन अँड टुब्रो’ला (एल अँड टी) पात्र ठरली आहे. तर पॅकेज २ साठी एचसीसी व एचडीसी ही कंपनी पात्र ठरली आहे. याबाबत मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचीवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेने स्थायी समितीच्या  मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये एल अँड टी आणि एचसीसी-एचडीसी या दोन कंपन्या पात्र ठरल्या आहेत. एल अँड टीला दोन भागांचं तर एचसीसीला एका भागाच्या कंत्राट मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं.
 

  • प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी उद्यान(पॅकेज ४) : एल अँड टी (३५०५ कोटी रुपये)
  • प्रियदर्शनी उद्यान ते बडोदा पॅलेस(पॅकेज १) : एल अँड टी(२७९८ कोटी रुपये)
  • बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक(पॅकेज २) :एचसीसी-एचडीसी(२१२६ कोटी रुपये)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा