Advertisement

मुंबईतील ९० टक्के जुन्या सोसायट्यात बसवता येईल रेनवाॅटर हार्वेस्टिंग यंत्रणा

मालमत्ता करातील सवलतीचा फायदा मुंबईतील ६० ते ७० हजार सोसायट्यांना घेता येऊ शकतो, असं मत महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी व्यक्त केलं आहे.

मुंबईतील ९० टक्के जुन्या सोसायट्यात बसवता येईल रेनवाॅटर हार्वेस्टिंग यंत्रणा
SHARES

इमारतीच्या आवारात रेनवॅाटर हार्वेस्टिंग करणार्‍या तसंच ओला-सुका कचऱ्याचं वर्गीकरण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना मालमत्ता करात १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय नुकताच मुंबई महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा मुंबईतील ६० ते ७० हजार सोसायट्यांना घेता येऊ शकतो, असं मत महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी व्यक्त केलं आहे. 

७० हजार जुन्या सोसायट्या

मुंबईत सद्यस्थितीत ३५ हजार को-आॅप हाऊसिंग सोसायट्या आणि ३५ हजार इतर इमारती आहेत. अशा एकूण ७० हजार इमारतींपैकी मुश्किलीने १० टक्के इमारतींमध्ये रेन वाॅटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असेल. त्यामुळे अंदाजे ६० हजार इमारतींमध्ये ही सुविधा उभारण्याची तेथील रहिवाशांना संधी आहे.

२ ते ४ लाखांचा खर्च 

रेन वाॅटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यासाठी सोसायटीला इमारत परिसरात एखादी बोअरवेल तयार करावी लागेल किंवा पाण्याची टाकी बसवावी लागेल. तसंच पाईप आणि इतर खर्च गृहीत धरल्यास सोसायटीला २ ते ४ लाखांपर्यंत खर्च करावा लागेल. पण मिळणाऱ्या सवलतीकडे बघता हा खर्च पुढच्या ५-७ वर्षांमध्ये सहज वसूल होईल, असं प्रभू म्हणाले.

बहुतेक जुन्या सोसायट्या हा खर्च करण्यास किंवा रेन वाॅटर हार्वेस्टिंगची व्यवस्था बसवण्यास तयार नसतात. पण दरवर्षी उन्हाळ्यात होणाऱ्या पाणी संकटाकडे बघता सोसायटीतील सदस्यांनी स्वत:हून पुढं येत रेन वाॅटर हार्वेस्टिंग आणि कचरा वर्गीकरणाची व्यवस्था सोसायटीच्या आवारात उभारली पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.  

‘अशी’ मिळेल सवलत

  • ज्या सोसायट्या ओला आणि सुका कचर्‍याचे वर्गीकरण करून त्याचं रूपांतर खतात करतील अशा सोसायट्यांना मालमत्ता करात ५ टक्के सवलत मिळेल.
  • ज्या सोसायट्या कचर्‍याचं वर्गीकरण करून सुक्या कचर्‍याचा पुनर्वापर करणार्‍या संस्थेला सोपवतील आणि कचर्‍याचं प्रमाण ५० टक्क्क्यांपर्यंत खाली आणतील, अशा सोसायट्यांना करात ५ टक्के सवलत मिळेल.
  • ज्या सोसायट्या त्यांच्या आवारातील सांडपाण्याचा पुनर्वापर स्वच्छता गृहासाठी करतील आणि सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवतील अशा सोसायट्यांना करात ५ टक्के सवलत मिळेल. 

 


हेही वाचा-

प्रक्रिया करूनच सांडपाणी समुद्रात सोडा, हायकोर्टाचे महापालिकेला आदेश

कचरा वेगळा करणाऱ्या हाउसिंग सोसायट्यांना पालिकेकडून मालमत्ता करावर १५ टक्के सूट



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा