Advertisement

मेट्रो भवन, कारशेड मुंबईसाठी ठरणार धोकादायक

आरेमध्ये उगम पावणऱ्या नदीपात्राच्या दोन्ही बाजूंस अनेक प्रकल्पांसाठी सिमेंटची भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे नदीतील पाणी मुरण्यास जागाच शिल्लक नसल्यामुळे येथील पूरक्षेत्राला धोका निर्माण झाला आहे.

मेट्रो भवन, कारशेड मुंबईसाठी ठरणार धोकादायक
SHARES

भविष्यातील नवीन प्रकल्पांमुळे आरेमधून उगम पावणाऱ्या ओशिवरा आणि मिठी या दोन नद्यांच्या पाणलोट क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची भिती वर्तवण्यात आली आहे. कमला रहेजा वास्तुस्थापत्य संस्थेच्या संशोधन विभागाने ‘आरे मॅपिंग’ या अभ्यासात प्रस्तावित मेट्रो भवन,  मेट्रो कारशेड, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील बांधकामे, प्राणिसंग्रहालय अशा अनेक प्रकल्पांचा फटका पाणलोट आणि पूरक्षेत्रास बसेल, असं मत मांडलं आहे. 

कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अ‍ॅण्ड एन्व्हॉयर्नमेन्ट स्टडीज्, मुंबईच्या संशोधन विभागाने ‘आरे मॅपिंग’ हा अभ्यास केला आहे. आरेमधून उगम पावणाऱ्या ओशिवरा आणि मिठी या दोन नद्यांच्या पाणलोट क्षेत्रावर भविष्यात काय परिणाम होतील, याचा अभ्यास करण्यात आला आहे.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी असलेला या भूभागाचा संपर्क तुटण्याची शक्यता यामध्ये वर्तवली आहे. तर भविष्यात कोल्हापूर व सांगलीसारखी महापूरस्थिती मुंबईतही निर्माण होऊ शकते, अशी भिती व्यक्त केली आहे. 

कमला रहेजाच्या श्वेता वाघ, हुसैन इंदोरवाला, मीनल येरमशेट्टी, रेश्मा मॅथ्यू, मिहीर देसाई या वास्तुविशारदांनी प्रत्यक्ष ठिकाणांवर जाऊन आणि जीआयएस तंत्राचा वापर करून अभ्यास केला आहे. १९४० पासून आतापर्यंत आरेमध्ये आलेल्या प्रकल्पांमुळे जागेचा वापर अनेक वेळा बदलला गेला आहे. त्यामुळे भविष्यातील नैसर्गिक आपत्तींच्या होणाऱ्या परिणामांचा अभ्यास या वेळी करण्यात आला आहे.

अभ्यासात नमूद केलं आहे की, आरेमध्ये उगम पावणऱ्या नदीपात्राच्या दोन्ही बाजूंस अनेक प्रकल्पांसाठी सिमेंटची भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे नदीतील पाणी मुरण्यास जागाच शिल्लक नसल्यामुळे येथील पूरक्षेत्राला धोका निर्माण झाला आहे. नद्यांचा उगम आणि सुरुवातीच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यास पाणी जमिनीत मुरणार नाही. त्यामुळे नदीपात्राच्या खालील भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका होऊ शकतो. हेही वाचा -

नोव्हेंबर संपत आला तरी मुंबईकरांना अद्याप थंडीची प्रतीक्षा कायम

पालिकेला खड्डे दाखवून त्याने कमावले ५ हजार रुपये
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा