Advertisement

मुंबईतील तुंबलेल्या ठिकाणांचा कृती आराखडा


मुंबईतील तुंबलेल्या ठिकाणांचा कृती आराखडा
SHARES

२९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ज्या ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते, त्या सर्व ठिकाणांचा व परिस्थितीचा सविस्तर अभ्यास करुन त्यावर आधारित कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शुक्रवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. हा कृती आराखडा बनवण्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल आणि अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पाचे संचालक विनोद चिठोरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच आवश्यक तेथे सर्वेक्षण करण्याचेही आदेश या समितीला आयुक्तांनी दिले आहेत.


भविष्यातील उपाययोजना

मुंबईत २९ ऑगस्ट २०१७ रोजी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शुक्रवारी आपल्या मासिक आढावा बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी संबंधित परिसरात काय परिस्थिती होती आणि कशाप्रकारे त्यावर कार्यवाही केली आणि भविष्यातील उपाययोजना काय करता येऊ शकतात आदी मुद्दयांवर संगणकीय सादरीकरण केले. यावेळी सर्व सहायक आयुक्त, तसेच विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. 

दरम्यान, उघड्या मॅनहोल्समध्ये पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी कोणत्याही प्रकारची चर्चा अथवा सूचना करण्यात आलेली नाही. त्यामुळे कृती आराखड्याचे कारण पुढे करत विरोधकांना शांत करण्याचे काम आयुक्तांकडून केले जात असल्याचे बोलले जात आहे.


उघड्यावर अन्न शिजवणाऱ्यांविरोधात पोलिस तक्रार

रस्त्यांवर अन्न शिजवणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करून पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार आतापर्यंत २४ विभाग कार्यालयांमध्ये १२४ उघड्यावर अन्न शिजवणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून त्यातील २२ जणांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली आहे. गॅस वितरकांनाही अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या असून भारत व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपन्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार या कंपन्यांनीही आपल्या वितरकांना सूचना दिल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.



हेही वाचा

मुंबईत पाऊस ओसरला, कचरा मात्र साचला!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा