Advertisement

वरळीतील मॅनहोलमध्ये सापडला डॉ. अमरापूरकर यांचा मृतदेह


वरळीतील मॅनहोलमध्ये सापडला डॉ. अमरापूरकर यांचा मृतदेह
SHARES

बॉम्बे रुग्णालयाचे पोटविकार तज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह अखेर मुंबईतील वरळीतील खुल्या मॅनहोलमध्ये सापडला. 29 ऑगस्टला मुंबईत झालेल्या पावसात ते बेपत्ता झाले होते. गेल्या 16 तासांपासून अग्निशमन दलाने त्यांच्या शोधकार्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, गुरुवारी सकाळी वरळीतील ड्रेनेजच्या पाईपलाईनमध्ये त्यांचा मृतदेह सापडला.


वरळी-कोळीवाड्यात त्यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी त्यांचा मृतदेह ओळखला आहे. त्यांचा मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

- रश्मी करंदीकर, डीसीपी, मुंबई पोलिस


प्रभादेवीत राहणारे डॉ. अमरापूरकर मंगळवारी दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान बॉम्बे हॉस्पिटलमधून घरी निघाले. लोअर परळ येथील इंडिया बुल्सजवळ त्यांनी आपली गाडी थांबवली. त्यानंतर, 10 मिनिटांच्या अंतरावर घर असल्याने 'मी चालत जाईन' असे म्हणत ते गाडीतून उतरले आणि गुडघाभर पाण्यातून वाट काढत चालत राहिले. पण ते घरी पोहोचलेच नाहीत.

पाण्याचा निचरा व्हावा म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांनी एल्फिन्स्टनमधील मॅनहोलचे झाकण काढले होतं. लोकांच्या माहितीसाठी त्यात बांबू लावला होता. पण अंदाज न आल्याने डॉ. अमरापूरकर त्यात कोसळले. अखेर त्यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी पोलिसांना वरळी कोळीवाड्यात सापडला.


प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ

डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातील नामांकित 'गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट' (पोटविकारतज्ज्ञ) म्हणून त्यांची ओळख होती. हरिभाई देवकरण शाळेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. LJ वैद्यकीय शिक्षणही त्यांनी सोलापूरमधूनच पूर्ण केले होते. 

मुंबई विद्यापीठातील गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट शाखेतले ते पहिले तज्ज्ञ ठरले. बॉम्बे हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोअँड्रॉलॉजी विभागाचे ते प्रमुख होते. त्यांच्या पत्नी डॉ. अंजली या नायर रुग्णालयात कार्यरत आहेत. तर दोन्ही मुले उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आहेत.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा