Advertisement

फेरीवाला क्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर होणार कारवाई


फेरीवाला क्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर होणार कारवाई
SHARES

मुंबईतील रस्त्यांवर फेरीवाला क्षेत्र जाहीर करून याबाबत लोकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात येत आहेत. तरीही आतापासून काही फेरीवाला क्षेत्र असलेल्या रस्त्यांवर फेरीवाल्यांनी पथारी पसरवायला सुरुवात केली आहे. मात्र, या रस्त्यांवर आतापासून फेरीवाल्यांनी जागा अडवायला सुरुवात केली असली तरी यापूर्वी केलेल्या सर्वेत जे फेरीवाले पात्र ठरणार आहेत, त्यांनाच या रस्त्यांवर बसवले जाणार आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या सर्वच फेरीवाल्यांना पुन्हा हटवलं जाणार असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे.


मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिका धडक कारवाई करत आहे. रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर आणि शाळा, कॉलेज, रुग्णालय, मंदिर आणि महापालिका मंडई यापासून शंभर मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे या परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास महापालिकेने मज्जाव केला आहे. मात्र २०१४ मध्ये सुमारे ९९ हजार फेरीवाल्यांचे अर्ज स्वीकारत सर्वे करण्यात आला होता. यासर्व पात्र आणि अपात्र फेरीवाल्यांची निवड करून महापालिकेकडून निश्चित करण्यात आलेल्या फेरीवाला क्षेत्रात बसण्यास दिले जाणार आहे.


पात्र फेरीवाल्यांनाच परवानगी

पात्र फेरीवाल्यांना एका रांगेत बसून धंदा करता यावा म्हणून महापालिकेने यापूर्वी न्यायालयात फेरीवाला क्षेत्राची यादी सादर केली होती. त्याच यादीत सुधारणा करण्यासाठी महापालिकेने हरकती आणि सूचना मागवल्या आहे. त्यामुळे या यादीला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर शहर विक्रेता समितीने पात्र ठरवलेल्या फेरीवाल्यांचे पुनर्वसन या फेरीवाला क्षेत्र असलेल्या रस्त्यांवर केले जाणार आहे.


जागा अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर होणार कारवाई

मात्र, सध्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असल्यामुळे अनेक फेरीवाल्यांनी सुरक्षित जागा पकडून फेरीवाला क्षेत्र असलेल्या रस्त्यांचा आसरा घेतला आहे. माहीममधील टी. एच. कटारिया मार्गासह अनेक रस्ते हे फेरीवाला क्षेत्र असून यासर्व रस्त्यांवर सध्या अनेक फेरीवाल्यांनी आतापासून जागा अडवून ठेवली आहे. त्यामुळे सर्वे केलेल्या फेरीवाल्यांशिवाय आता नवीन फेरीवाल्यांनी जागा अडवली. त्यामुळे या फेरीवाल्यांना हटवण्याची महापालिकेवर असलेली जबाबदारी वाढली आहे.


महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार फेरीवाल्यांवरील कारवाई आणि धोरणांच्या अंमलबजावणीची कार्यवाही सुरू आहे. सध्या फेरीवाला क्षेत्र रस्त्यांच्या यादीसंदर्भात लोकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात येत आहेत. जर या फेरीवाला क्षेत्रातील रस्त्यांवर आतापासूनच कोणी जागा अडवून धंदा करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

- आबासाहेब जऱ्हाड, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सध्या सुमारे ९९ हजार अर्जांच्या डाटा एंट्रीचे काम सुरु आहे. हे अर्जावर शहर विक्रेता समितीने पात्रतेबाबत निर्णय घेतल्यानंतर निश्चित करण्यात येणाऱ्या फेरीवाला क्षेत्र असलेल्या रस्त्यांवर या पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा