Advertisement

मुंबईच्या 'या' भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ


मुंबईच्या 'या' भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ
SHARES

मुंबईत ऑगस्ट महिन्यापासून म्हणजेच गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णाची वाढत्या संख्येमुळं बंद केलेले विलगीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा वाढविण्यात आल्या. मात्र तरीही अनेक ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे. अशातच मुंबईच्या बोरिवली, वांद्रे (पश्चिम), ग्रॅण्ट रोड, अंधेरी (पश्चिम) भागांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा जोर वाढत आहे.

मुंबईमधील बोरिवली (पालिकेचा विभाग आर-मध्य), वांद्रे पश्चिम (एच-पश्चिम), ग्रॅण्ट रोड (डी), अंधेरी पश्चिम (के-पश्चिम) या विभागांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत अवघ्या ७ दिवसांमध्ये (२२ ते २८ सप्टेंबर) अनुक्रमे १,२७७, ६०७, ८११ आणि १,०८१ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

बोरिवली आणि वांद्रे पश्चिम विभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ अनुक्रमे ४६ व ४९ दिवस असून मुंबईतील अन्य भागांच्या तुलनेत या भागांतील हा काळ सर्वात कमी आहे.

मुंबईतील सॅण्डहर्स्ट रोड (बी), परळ (एफ-दक्षिण), घाटकोपर (एन), कुर्ला (एल), दादर (जी-उत्तर), भांडुप (एस), चेंबूर-पर्व (एम-पूर्व) आणि एल्फिन्स्टन (जी-दक्षिण) या विभागांतील वाढत्या रुग्णसंख्येला काही प्रमाणात आळा घालण्यात पालिका यशस्वी झाली आहे. त्यामुळे या भागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ८५ ते ९६ दिवसांच्या दरम्यान आहे.

गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्यासाठी आणि खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडले होते. त्यावेळी बाजारपेठांमध्ये सुरक्षित अंतराच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. झाली होती. त्यानंतरच्या गावाहून परतणाऱ्यांमुळे मुंबईतील संसर्गाचा धोका काही अंशी वाढला. या सर्व बाबी लक्षात घेऊन पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या करण्याचे आदेश दिले. 

आतापर्यंत ११ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांचे प्रमाण वाढविल्यानंतर मुंबईत मोठ्या संख्येने रुग्ण सापडू लागले आहेत. संसर्गाचा प्रसार वाढू नये म्हणून रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयितांना गृह किंवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यावर पालिकेने भर दिला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा