Advertisement

मुंबईतील 'या' परिसरात सर्वाधिक रुग्णवाढ


मुंबईतील 'या' परिसरात सर्वाधिक रुग्णवाढ
SHARES

गुरुवारी मुंबईतील वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. दर दिवशी आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक बाधित अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले पश्चिम भागांत आढळून आले आहेत. या भागांत गेल्या आठवड्याभरात १३००हून अधिक रुग्ण आढळले आहेत, तर उपचाराधीन रुग्णांची संख्याही या विभागात सर्वात जास्त आहे.

मुंबईत गेल्या महिन्याभरात रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र त्यातही मुंबईच्या काही भागांमध्ये ही रुग्णवाढ सर्वात जास्त आहे. पूर्व उपनगरांत मुलुंड आणि पश्चिम उपनगरांत अंधेरी, जोगेश्वरी परिसरात ही रुग्णवाढ सर्वात जास्त आहे. त्यातही गेल्या आठवड्याभरातील आकडेवारीनुसार अंधेरी, जोगेश्वरी परिसराचा रुग्णवाढीत पहिला क्रमांक लागला आहे.

संपूर्ण मुंबईचा रुग्णवाढीचा सरासरी दर ०.५१ टक्के  असताना अंधेरी पश्चिममध्ये हाच दर ०.८१ टक्के  आहे. तर रुग्णदुपटीचा सरासरी कालावधी १३६ दिवस असला तरी या भागात हाच कालावधी ८६ दिवसांइतका कमी आहे. या भागात उपचाराधीन रुग्णही मुंबईतील इतर भागांच्या तुलनेत जास्त आहेत. तसेच प्रतिबंधित इमारती व प्रतिबंधित मजल्यांची संख्याही याच भागात सर्वात जास्त आहे.

दरम्यान, संपूर्ण मुंबईप्रमाणेच अंधेरीतही इमारतींमधील रुग्णांची संख्या अधिक आहे. एकूणच लोकांचा सामाजिक वावर वाढलेला आहे. त्यामुळे संसर्ग वाढत आहे. त्यातही या भागात विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी ही मोठी स्थानके  आहेत. ती हार्बरला जोडलेली आहेत. तसेच अंधेरीत मेट्रोनेही मोठ्या संख्येने प्रवासी येतात. त्याचबरोबर जुहू चौपाटीवर येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कडक केल्या आहेत. दर दिवशी केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले असून दर दिवशी ७०० ते १००० चाचण्या केल्या जात आहेत.

तसेच मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली असून जुहू चौपाटीवर क्लीन अप मार्शलची संख्याही वाढवण्यात आल्याची माहिती विश्वास मोटे यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा