Advertisement

वर्सोवा कोळीवाड्यातील 5 अनधिकृत इमारतींवर कारवाई


वर्सोवा कोळीवाड्यातील 5 अनधिकृत इमारतींवर कारवाई
SHARES

अंधेरी पश्चिम विभागातील वर्सोवा गावठाण-कोळीवाडा परिसरातील 5 अनधिकृत इमारतींवर गुरुवारी महापालिकेच्या वतीने कारवाई करून त्या तोडून टाकण्यात आल्या आहेत. वर्सोवा जेट्टीजवळ सुमारे तीन हजार चौरस फुटांच्या जागेत बांधलेली तीन आणि खाडी परिसरालगत चार बांधकामे होती. त्यातील पाच अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई करण्यात आली.

अंधेरी परिसरातील आणि गावठाणामध्ये वर्सोवा जेट्टीजवळील साधारणपणे 3 हजार चौरस फुटांच्या जागेवर तीन मजली अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. त्याचबरोबर खाडी परिसरालगतच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असणाऱ्या सुमारे 8 हजार 500 चौरस फूट जागेवर देखील 4 ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू होती. यामध्ये व्यवसायिक स्वरुपाच्या बांधकामांचाही समावेश दिसून, येत होता. यानुसार 11 हजार 500 चौरस फूट जागेवर उभारण्यात येत असलेली तसेच उभारलेली 5 अनधिकृत बांधकामे गुरुवारी महापालिकेच्या पथकाद्वारे तोडण्यात आली आहेत. या कार्यवाहीसाठी 1 छोटे पोकलेन यंत्र व इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली. महापालिकेचे 15 कामगार, कर्मचारी व अधिकारी तसेच मुंबई पोलीस दलाचे कर्मचारी आदी या कारवाईत सहभागी झाले होते. 

जोगेश्वरीतील रेहान टॉवरच्या अनधिकृत बांधकामावरही कारवाई

जोगेश्वरी पश्चिम परिसरातील स्वामी विवेकानंद मार्गाच्या पश्चिमेला असलेल्या बांदिवली हिल मार्गाजवळील ‘मिना इंटरनॅशनल’ हॉटेलच्या शेजारील ‘रेहान टॉवर’ मधील अनधिकृत बांधकामांवरही महापालिकेने कारवाई केली. या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर पोडियमच्या जागेत अनधिकृतपणे सुमारे 450 चौरस फुटांची एक सदनिका होती. या अनधिकृत सदनिकेवरही कारवाई करून ते तोडण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

कॅप्टन सुरेश सामंत मार्गावरील 20 अनधिकृत बांधकामांवर कारवाई

जोगेश्वरी पश्चिममधील स्वामी विवेकानंद मार्गालगत असलेल्या कॅप्टन सुरेश सामंत मार्गावर 8 पक्क्या स्वरुपाच्या आणि 12 कच्च्या स्वरुपाची अनधिकृत बांधकामे होती. यामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. तसेच पादचाऱ्यांनाही चालताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असे. या यासर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ही बांधकामे हटवल्यामुळे हा रस्ता मोकळा झाला असून, या मोकळ्या झालेल्या रस्त्याची तसेच पदपथाची डागडुजी करून हा रस्ता उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा