Advertisement

प्रभादेवी मंदिराला कमानी स्वरुपात प्रवेशद्वार उभारणार!

मुंबईतील ३०० वर्षे पूर्ण होत असलेल्या प्रभादेवी मंदिराच्या प्रवेशद्वारावर कमान उभारण्याची मागणी आता नगरसेवकांकडून होत आहे. या मंदिराच्या दर्शनी भागावर भव्य कमान अथवा प्रवेशद्वार उभारण्याची मागणी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी केली आहे. याबाबतच्या ठराव गटनेत्यांच्या सभेत मंजूर करून आयुक्तांकडे पुढील अभिप्रायासाठी पाठवून देण्यात आला आहे.

प्रभादेवी मंदिराला कमानी स्वरुपात प्रवेशद्वार उभारणार!
SHARES

प्रभादेवी मंदिराला यंदा ३०० वर्षे पूर्ण होत आहे. अशाप्रकारे ३०० वर्षे पूर्ण झालेल्या तुळजापूर आणि अक्कलकोट मंदिराच्या त्रिशतकोत्सव वर्षानिमित्त प्रवेशद्वाराजवळ कमान तथा प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. याच धर्तीवर मुंबईतील ३०० वर्षे पूर्ण होत असलेल्या प्रभादेवी मंदिराच्या प्रवेशद्वारावर कमान उभारण्याची मागणी आता नगरसेवकांकडून होत आहे. 

या मंदिराच्या दर्शनी भागावर भव्य कमान अथवा प्रवेशद्वार उभारण्याची मागणी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी केली आहे. याबाबतच्या ठराव गटनेत्यांच्या सभेत मंजूर करून आयुक्तांकडे पुढील अभिप्रायासाठी पाठवून देण्यात आला आहे.


त्याची ओळख प्रभादेवी मंदिरामुळे

दादर- प्रभादेवीमध्ये सिद्धिविनायक मंदिर असलं तरी त्याची खरी ओळख ही प्रभादेवी मंदिरामुळे आहे. प्रभावती देवी असं या मंदिराचं मूळ नाव असून काळाच्या ओघात अपभ्रंश होऊन तिला प्रभादेवी असं नाव प्राप्त झालं आहे. या मंदिरास यावर्षी ३०० वर्षे पूर्ण होत असल्याचं हेमांगी वरळीकर यांनी स्पष्ट केलं.

प्रभादेवी ही मूळची शाकंबरी देवी. सध्या मंदिरात असलेली मूर्ती ही १२ व्या शतकातली आहे. शिलाहारानंतर देवगिरीचे यादव मुंबई बेटावर आले आणि राजा बिंब याने आपली राजधानी माहीम येथे स्थापन केली. त्यावेळी त्यांनी माहीम आणि प्रभादेवी येथे काही मंदिरं स्थापन केली.


प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला

या शाकंबरी देवीच्या जत्रेचं आयोजन दर जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात केलं जातं. त्यामुळे या मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व आणि भविष्यातील एक धार्मिक स्थळ म्हणून उदयास येणाऱ्या प्रभादेवीचा परिसर पाहता या मंदिराच्या दर्शनी भागावर भव्य कमान उभारण्याची मागणी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेत आयुक्तांकडे अभिप्रायसाठी पाठवण्यात आल्याचं वरळीकर यांनी स्पष्ट केलं.


'येथे' दर्शनी भागावरही प्रवेशद्वार!

वरळी कोळीवाडा येथील ऐतिहासिक किल्ल्याचं महत्त्व लक्षात घेऊन कोळीवाड्याच्या दर्शनी भागावर भव्य कमान अथवा प्रवेशद्वार उभारण्याची मागणीही उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी केली आहे. या मागणीला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तत्वता मान्यता देऊन पुढील अभिप्रायसाठी महापालिका आयुक्तांकडे हा प्रस्ताव पाठवला आहे.


यालाही ऐतिहासिक महत्त्व

वरळी कोळीवाडा हा पुरातन किल्ला असून त्यालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. हा किल्ला १५६१ मध्ये पोर्तुगीजांनी बांधला होता. त्रिकोणाकृती बुरुज आणि या बुरुजावर घंटा बांधण्यासाठी असलेला मनोरा ही विशेष करून पोर्तुगीज स्थापत्यशास्त्राची वैशिष्ट्यं या किल्ल्यात आढळतात. बंगालच्या उपसागरावर माहीमच्या खाडीवर पाळत ठेवण्यासाठी आणि आरमारी हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता, असंही वरळीकर यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा