Advertisement

फेरीवाल्यांवरील कारवाईवरून शेलार, महापौरांमध्ये जुंपणार


फेरीवाल्यांवरील कारवाईवरून शेलार, महापौरांमध्ये जुंपणार
SHARES

सलमान खानच्या घरासमोरील शौचालयाच्या बांधकामावरून भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यात जोरदार वाद झाला होता. आता लिंकिंग रोडच्या फेरीवाल्यांवर करण्यात आलेल्या कारवाईवरून दोघांमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे.

पालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे व एच पश्चिम विभागातील अधिकारी स्थानिक आमदार आशिष शेलार यांच्या दिमतीला बांधल्याप्रमाणे वागत आहेत. त्यामुळे महापौरांनी बोलावल्यानंतरही आम्हाला वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगणाऱ्या उर्मट अधिकाऱ्यांची मस्ती महाडेश्वर यांनी चांगलीच उतरवली. लिंकिंग रोडवरील फेरीवाले अनधिकृत असतील, तर जरुर कारवाई करा. पण कुणाच्या सांगण्यानुसार आणि सूडबुद्धीने कारवाई करू नका, अशा शब्दांत महापौरांनी शेलारांच्या पंखाखाली वावरणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

वांद्रे-खार पश्चिम येथील लिंकिंग रोडवरील फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईबाबत महापौरांकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी याची माहिती जाणून घेण्यासाठी या एच पश्चिम विभागातील परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावले. परंतु परवाना विभागाच्या वरिष्ठ परवाना अधिकारी यांनी आपल्याकडे येण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे उर्मट दिले होते. एवढेच नाही, तर महापौरांकडे तक्रार केली म्हणून तक्रारदार फेरीवाल्यांच्या गाळ्यांवरही कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यामुळे खुद्द महापौरांकडे येण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेण्याची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांना महापौरांनी शुक्रवारी आपल्या कार्यालयात बोलावून चांगलीच कानउघडणी केली.

महापौरांकडे येण्यास नकार देणारे हे अधिकारी कोण? हे पाहण्यासाठीच आपल्याला बोलावले, अशा शब्दांत महाडेश्वर यांनी त्यांचे स्वागत केले.

''या हिंमतीबाबत आपल्याला आयुक्तांना सांगून प्रमाणपत्र देण्यास सांगतो. लिंकिंग रोडवरील फेरीवाले अनधिकृत असतील तर जरूर कारवाई करा. प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु कुणाच्या सांगण्यानुसार ही कारवाई होणार असेल, तर ते योग्य नाही. एका विभागात एक न्याय आणि दुसऱ्या विभागात दुसरा न्याय हे चालणार नाही. माझा काही तिथे गाळा नाही. किंबहुना ते आमचे शिवसैनिक नाहीत. परंतु जेव्हा माझ्याकडे तक्रार येते, तेव्हा त्याची माहिती घेणे हे माझे कर्तव्य आहे. मात्र ते लोक माझ्याकडे आले म्हणून तुम्ही कारवाई करत असाल तर ही मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही. आमदारांचे छत्र डोक्यावर आहे, म्हणून मस्ती चढली असेल, तर तीही उतरवली जाईल. आमदारांचे ऐका. पण कारवाई नियमानुसारच व्हायला हवी. कुणाच्या सांगण्यानुसार केली जावू नये'', अशा शब्दांत महापौरांना अधिकाऱ्याला शालजोडीतले मारले.

''तुम्ही नियमानुसार काम करा, चांगले काम करा,आम्ही तुमचा नक्कीच सत्कार करू, पण कुणाच्या सांगण्यानुसार जर जाणीवपूर्वक कारवाई होणार असेल,तर इथे महापौर म्हणून मी ते खपवून घेणार नाही'', असे खडे बोलही सुनावले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा