Advertisement

का म्हणाले आशिष शेलार 'काटा लगा'?


का म्हणाले आशिष शेलार 'काटा लगा'?
SHARES

भाजपा नालेसफाईच्या कामाबाबत 100 टक्के असमाधानी असून, नालेसफाई कामात घोटाळा झाल्याचा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी बुधवारी पुन्हा केला. पश्चिम उपनगरांतील दुसऱ्या टप्प्यातल्या नालेसफाईचा पाहणी दौरा केला त्यावेळी शेलार यांनी पालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. गाळाचं वजन करणाऱ्या मिरा भाईंदर येथील वजनकाटा केंद्राच्या पावत्या बोगस असल्याचा दावा शेलार यांनी केला. गेल्या वर्षी याच वजनकाट्याच्या घोटाळ्यावर मुंबईकरांना ‘काटा रुते कुणाला’ हा प्रश्न पडला होता. या वर्षी आम्हाला हिंदी गाण्याचा आधार घ्यावा लागत आहे आणि ‘काटा लगा’ असं म्हणावं लागत आहे, अस म्हणत आशिष शेलार यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

ज्या कंत्राटदारांवर गतवर्षी भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांची चौकशी सुरू आहे आणि एफआयआर सुद्धा दाखल झालेल्या आहेत. अशा कंत्राटदारांना क्लिनचिट देण्यासाठी कालचा पाहणी दौरा होता असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. जबाबदारीच्या पदावर असणाऱ्यांना असे हात झटकता येणार नाहीत आणि भाजपा पारदर्शकतेचे पहारेकरी असून, हे भाजपा कधीही मान्य करणार नाही असेही आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

[मंगळवारच्या पहाणी दोऱ्यात उद्धव ठाकरे काय म्हणाले ते पहा - 100 टक्के नालेसफाई कधीच होऊ शकत नाही - उद्धव ठाकरे]

बोगस पावत्यांचा वापर

आशिष शेलार आणि भाजपाच्या आमदार, नगरसेवकांनी मरोळ येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील लेलेवाडी आणि कृष्णा नाल्याची पाहणी केली. त्यानंतर अंधेरी पूर्व, साकीनाका याभागातील मोगरा, ओशिवरा नदी यासह वर्सोवा येथील डंम्पिंग ग्राऊंडचीही पाहणी केली. यावेळी कंत्राटदार बोगस पावत्यांचा वापर करुन मुंबई महापालिकेला फसवत असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला.

या नाल्यातील गाळ कुठे टाकला जातो? याबाबत विचारणा केल्यानंतर कंत्राटदाराने विविध पावत्या सादर केल्या. यामधील काही पावत्यांवर वजन करणाऱ्याची सही, सुपरवायझरची सही दिसून आली नाही. ज्या नाल्यातून गाळ काढला जातो आहे. तो गाळ मिरा-भाईंदर येथील वजनकाट्यावर वजन केला जात आहे आणि वर्सोवा येथील खाजगी डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात आहे. या सगळ्याच्या कागदपत्रांमध्ये तफावत दिसून येते आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने अजूनही गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे असा आरोप आशिष शेलार यांनी लावला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा