लालूप्रसाद यांच्याविरोधात अटल बिहारी जाणार न्यायालयात

 Azad Maidan
लालूप्रसाद यांच्याविरोधात अटल बिहारी जाणार न्यायालयात

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात लवकरच आपण न्यायालयात दावा दाखल करणार असल्याची माहिती अटल बिहारी दुबे यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली आहे. लालूप्रसाद यांनी आपल्या एका भाषणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना आक्षेपार्ह शब्द वापरले. 28 फेब्रुवारीला मिर्जापूरमधल्या सभेत लालूप्रसाद यादव यांचा तोल सुटला आणि त्यांनी पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले, असा अटल बिहारी यांचा आरोप आहे. 

“देशातल्या जनतेचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्याच्या लालूप्रसाद यांच्या कृतीने आपण अस्वस्थ झालो आणि यासंदर्भात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.” अशी माहिती अटल बिहारी दुबे यांनी दिली. तूर्त त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वातावरण दूषित करणे आणि मानहानीबद्दल भारतीय दंड विधान 504 आणि 505 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटल बिहारी दुबे हे स्वतः पेशाने वकील असून गेली काही वर्ष ते मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात.

आझाद मैदान पोलीस ठाण्यात अटल बिहारी यांनी लालूप्रसाद यांच्याविरोधात लिखित स्वरुपात तक्रार दिली होती. पण आपल्या तक्रारीची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही, असा अटल बिहारी यांचा आरोप आहे. या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर नाईलाजाने पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली, असे अटल बिहारी यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला सांगितले. आता आपण एवढ्यावरच थांबणार नसून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष न्यायालयात लावणार. संवैधानिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा पर्यायाने समस्त देशबांधवांचा अपमान करणाऱ्या लालूप्रसाद यादव यांना न्यायालय योग्य शिक्षा सुनावेल, असा दावा अटल बिहारी दुबे आतापासूनच करत आहेत.

Loading Comments