Advertisement

‘बेस्ट’च्या वीज कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या काळात काम करणं जातंय कठीण


‘बेस्ट’च्या वीज कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या काळात काम करणं जातंय कठीण
SHARES

लोकलनंतर 'बेस्ट'ला मुंबईची लाइफलाइन मानलं जातं. मुंबईकरांना अखंडित वीजपुरवठा तसंच, वाहतूक सेवा ही बेस्ट प्रशासनाकडून दिली जाते. बेस्ट कर्मचारी २४ तास कार्यरत असतात. कोणत्याही क्षणी काही घडलं. तर तातडीनं बेस्टचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेतात. मात्र, सध्या कोरोनाचं मुंबईवर सावट असल्यामुळं बहुतेक कर्मचारी आपल्या जीवाची काळजी घेत आहेत. परंतु, मुंबईला अखंडित वीजपुरवठा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आहे.

'बेस्ट'च्या विद्युतपुरवठा विभागातील कामगारांना कोरोनाच्या काळात काम करताना मोठी कसरत करावी लागते आहे. दिवसभर मीटर रीडिंगसाठी गल्लीबोळात फिरणं, जमिनीखाली वाहिन्या टाकण्यासाठी कित्येक तास खोदकाम करणं, वीज वाहिन्यांतील बिघाड दुरुस्त करणे अशी कामं करताना त्यांना सामाजिक अंतर पाळणं किंवा कोरोनाबाबतची काळजी घेणं केवळ अशक्य बनलं आहे.

बेस्टमध्ये विद्युतपुरवठा विभाग चुनाभट्टीपासून कुलाबा, बॅकबेपर्यंत वीजपुरवठा करण्याचं काम करत आहे. अधिकारी आणि कर्मचारी मिळून साधारण साडेपाच हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी किमान अडीच हजार कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करणारे कामगार आहेत. यामध्ये मीटर वाचन, रस्त्यावर केबल टाकणारे, मीटर लावणारे, विजेचा बिघाड दुरुस्त करणारे यांचा समावेश आहे. 

सतत फिरतीचं काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाचा हा काळ या जीवघेणा ठरतो आहे. बेस्टनं विद्युत विभागातील सर्व कामगारांना १०० टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. अशात विश्रांतिगृह नसल्यामुळं सतत हात धुणं कामगारांना शक्य नसतं. दिवसभर रस्त्यावर मास्क लावून अंग मेहनतीची कामं करणं हे या काळात खूपच त्रासदायक ठरत आहे. विद्युत विभागातील कामगारांना एक दिवसाआड बोलावले तर कामगारांवरचा ताण हलका होईल, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

कोरोनापासून वाचवण्यासाठी कोणतीच सुरक्षिततेची साधनं कामगारांना दिलेली नाहीत. तसेच ही उपकरणं घालून अंग मेहनतीची कामे करणे शक्य नसल्याचेही मत एका कामगाराने व्यक्त केले आहे. मास्क,पीपीई किट, फेस शिल्ड घालून काम करताना श्वास घेता येत नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा