Advertisement

...तर अॅम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकणारच नाही!


SHARES

त्याचा हात यानं घट्ट हातात धरला होता...सायरनचा आवाज याच्या कानात घुमत होता...मरायला टेकलेल्या वडिलांचा हात हातात धरुन अॅम्ब्युलन्समध्ये बसून रहाण्याशिवाय याच्याकडे पर्यायच नव्हता..बराच वेळ असाच गेला..त्याला काही कळत नव्हतं..आता सायरनसोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या हॉर्नचे आवाज येत होते...पण अॅम्ब्युलन्स जागेवरच थांबली होती...त्याच्या वडिलांच्या श्वासासारखी!

वर लिहिलेला प्रसंग काल्पनिक असला, तरी तशा अनेक घटना घडल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल. अॅम्ब्युलन्स वेळेवर घटनास्थळी किंवा रुग्णालयात वेळेवर पोहोचू शकली नाही म्हणून रुग्णाचा मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अॅम्ब्युलन्स वेळेवर पोहोचण्याचं मोल एखाद्याच्या जीवापेक्षा कमी नसावं. नव्हे, तसं ते नसतंच!

मुंबईच्या चिंचोळ्या गल्ल्या म्हणा किंवा हायवे..ट्रॅफिकची समस्या ही नेहमीचीच. या वाहतूक कोंडीत बऱ्याचदा रुग्णवाहिकाही अडकतात. अनेकदा तर वेळेवर उपचार मिळाले नाहीत म्हणून रुग्णाला जीवही गमवावा लागतो. मग अशा वेळी कुणाला जबाबदार धरणार? अॅम्ब्युलन्स चालवणाऱ्या ड्रायव्हरला? ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाड्यांना? की आतल्या रुग्णाच्या नशीबाला?

अशा प्रकारे ट्रॅफिकमध्ये अॅम्ब्युलन्स अडकून कुणाचा दुर्दैवी अंत होऊ नये याच विचाराने भांडूपमध्ये रहाणाऱ्या यश हजारेने एक जबरदस्त उपाय शोधून काढला आहे. अॅम्ब्युलन्स किंवा कुठलंही इमर्जन्सी व्हेइकल ट्रॅफिकमध्ये अडकून राहू नये म्हणून त्याने एक प्रोजेक्ट तयार केला आहे. या प्रोजेक्टचं नाव आहे ‘स्मार्ट कंट्रोल सिस्टिम फॉर इमर्जन्सी व्हेइकल’! एसएआयईएस विद्यालयात 13 वीत शिकणाऱ्या यशने बनवलेल्या या प्रोजेक्टमुळे कोणत्याही इमर्जन्सी व्हेइकलला ट्रॅफिकमधून बाहेर पडणं सोपं होऊ शकतं.


काय आहे ही संकल्पना?

मुख्य चौकात असलेल्या ट्रॅफिक सिग्नलवर एक रिसिव्हर बसवलेला असेल, तर त्याचा ट्रान्समीटर रुग्णवाहिकेत बसवलेला असेल. लाल, पिवळा, हिरवा रंगाच्या सिग्नलबरोबरच वरच्या बाजूला आणखी एक वेगळ्या रंगाचा दिवा आणि सायरन बसवलेला असेल. रुग्णवाहिका एक किलोमीटरच्या परिघात आली की, तसा संदेश ट्रॅफिक सिग्नलवर बसवलेल्या रिसिव्हरला मिळेल. त्यानंतर सिग्नलवर बसवलेला सायरन वाजेल. त्यामुळे अॅम्ब्युलन्स असलेल्या रस्त्याशिवाय इतर तिनही रस्त्यांवरचे सिग्नल लाल होतील. साहजिकच हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर त्या रस्त्यावरच्या गाड्या आपोआपच पुढे जातील आणि अॅम्ब्युलन्सला जाण्यासाठी रस्ता मोकळा मिळेल.


मुंबईतल्या रुग्णालयाजवळील ट्रॅफिकचे रस्ते

जे. जे. रुग्णालय – मोहम्मद अली रोड
केईएम, वाडिया आणि टाटा रुग्णालय – आचार्य दोंदे मार्ग , जेरबाई वाडिया रोड
नायर रुग्णालय – डॉ. ए. एल. नायर रोड
शताब्दी रुग्णालय(कांदिवली पू.) – कस्तुरबा क्रॉस रोड नंबर 2
कूपर रुग्णालय – भक्तीवेदंता स्वामी मार्ग, गुलमोहर रोड, जुहू


800 रुपयांत बनवला प्रोजेक्ट

यशने फक्त 10 दिवसांत हा प्रोजेक्ट तयार केला आहे. तसंच 800 रुपयांत हा प्रोजेक्ट बनवल्याचं त्यानं सांगितलं.


हेल्मेट घातल्याशिवाय बाईक सुरूच होणार नाही!

यशने या आधीही हेल्मेट घातल्याशिवाय बाईक सुरुच होणार नाही, असं एक उपकरण तयार केलं होतं. त्यासाठी त्याला वेगवेगळे पुरस्कारही देण्यात आले होते.


यशला हवाय मदतीचा हात

आदित्य ठाकरेंनी अॅम्ब्युलन्सच्या आवाजाची मर्यादा 120 डेसिबल केल्याचं जाहीर केलं. त्यामुळे इतरांना त्रास होईलच असं नाही, पण त्रास होऊ शकतो. यशच्या प्रकल्पामुळे तो त्रास होणार नाही. सरकारने किंवा इच्छुक गुंतवणूकदारांनी याची दखल घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे.

चांगदेव हजारे, वडील, यशचे वडील

घरची परिस्थिती बेतास बेत असल्यामुळे यशचे वडील देव हजारे हे त्याच्या प्रोजेक्टचं पेटंट घेऊ शकले नाहीत. पण, त्याच्या या प्रोजेक्टची दखल सरकारी पातळीवर घेतली गेली, तर कदाचित अॅम्ब्युलन्स वेळेवर पोहोचण्यासाठी मदत होईल आणि पर्यायाने काही जीव वाचू शकतील.


व्हिडिओग्राफर - गणेश रहाटे


हेही वाचा

अ‍ॅम्बुलन्सचा सायरन आता 120 डेसिबलने वाजणार!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा