Advertisement

भांडुप संकुलातील सांडपाण्यावर फेरप्रक्रिया; १० हजार लिटर पाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध

पाण्याचा होत असलेला अपव्यय टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं सांडपाण्यावर प्रक्रिया करून उपलब्ध होणारं पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

भांडुप संकुलातील सांडपाण्यावर फेरप्रक्रिया; १० हजार लिटर पाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध
SHARES

मुंबईत अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटल्यानं पिण्याचं पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असतं. त्यामुळं या पाण्याचा होत असलेला अपव्यय टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं सांडपाण्यावर प्रक्रिया करून उपलब्ध होणारं पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने मुंबईतील लोकसंख्या वाढत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईकरांना दररोज सुमारे ४,५०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र आजघडीला महापालिकेकडून ३,८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

भांडुप संकुलात उभारण्यात आलेल्या सांडपाणी पुनप्रक्रिया प्रकल्पातून तब्बल १० हजार लिटर पाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध झालं आहे. या पाण्याचा वापर महापालिकेच्या उद्यानांसाठी करण्यात येणार आहे. मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी महापालिकेला पावसावरच अवलंबून राहावं लागतं. कमी पाऊस पडल्यानंतर उन्हाळा जवळ येऊ लागताच मुंबईत पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळं मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाला तोंड द्यावं लागतं. ही बाब लक्षात घेऊन पालिकेनं सांडपाण्यावर पुनप्रक्रिया करून उपलब्ध होणारं पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेची उद्यानं, रस्त्यालगतच्या झाडांसाठी, तसंच वाहनं, लादी व कपडे धुण्यासाठीही या पाण्याचा वापर होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनानं वरळी, धारावी, वेसावे, भांडुप, घाटकोपर, वांद्रे आणि मालाड इथं सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी भांडुप संकुलातील सांडपाणी पुनप्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. पुनप्रक्रिया केलेल्या पाण्याच्या वापराबाबत धोरण आखणं, पाणी विकत घेणाऱ्यांचा शोध घेणं आदी विविध कामांसाठी लवकरच सल्लागारांची नेमणूक करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा