Advertisement

महापालिकेने विकासकापुढे हात टेकले, भांडुपच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची जागा विकासकाला परत


महापालिकेने विकासकापुढे हात टेकले, भांडुपच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची जागा विकासकाला परत
SHARES

भांडुप पश्चिम नाहुर गाव येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची जागा पुन्हा विकासकाला देण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. उच्च न्यायालयात महापालिकेच्या विरोधात हा निकाल गेल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मागणी करत हा भूखंड विकासकाला न देण्याची मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली होती. पण प्रत्यक्षात हा भूखंड महापालिकेनं विकासकाला देऊन टाकला आहे. हा भूखंड देण्यासाठी महापालिकेच्या सुधार समितीसह कोणत्याही समितीच्या मंजुरीची आवश्यकता नाही, असं सांगत सादर केलेले प्रस्तावही परत घेण्याची प्रक्रिया महापालिकेनं सुरू केली आहे.


टीडीआर विकासकानं वापरला

भांडुपमधील १८ हजार ७६५ चौरस मीटरची आरक्षित जागा विकासक रुणवाल होम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं महापालिकेला हस्तांतरीत केली. हा भूखंड हस्तांतरीत करताना यावरील विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) विकासकानं वापरला. त्यामुळे या सर्व भूखंडावर महापालिकेनं सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधण्यात येणार होतं. पण या १८ हजार ७६५ चौरस मीटरपैकी ८ हजार २०९ चौरस मीटरची जागा जी रस्त्यानं बाधित होणार आहे, ती परत महापालिकेकडे मागितली.



सुधार समितीनं प्रस्ताव फेटाळला 

या संदर्भात विकासकानं उच्च न्यायालयात याचिका करत या जागेची मागणी केली आणि न्यायालयानं ही जागा विकासकाला परत देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही जागा विकासकाला परत देण्यासंदर्भात सुधार समितीपुढे प्रस्ताव सादर केला होता. पण सुधार समितीनं हा प्रस्ताव फेटाळत याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली होती. पण सुधार समितीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत महापालिकेनं ८ हजार २०९ चौरस मीटरची जागा विकासकाला २८ सप्टेंबर २०१७ रोजी परत देऊन टाकला आहे.


म्हणून भूखंड विकासकाला परत दिला

न्यायालयानं दोन आठवड्यांमध्ये कारवाई करण्याचे निर्देश दिल्यामुळे, तसेच वरिष्ठ विधीतज्ज्ञ भरुचा यांनी दिलेल्या अभिप्रायानुसार हा भूखंड परत विकासकाला देण्यासाठी सुधार समिती किंवा महापालिकेच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार हा भूखंड विकासकाला परत देण्यात आल्याचं विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी स्पष्ट केलं.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विकासकाला भूखंड परत दिल्यामुळे शिल्लक असलेल्या १० हजार ५५६ चौरस मीटरच्या भूखंडावर नियोजित सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येईल. यासाठी वास्तूविशारद शशी प्रभू आणि असोसिएट्स यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. या ठिकाणी ३६९ खाटांचं रुग्णालय बांधण्यात येणार असून त्यामध्ये गॅस्ट्रो इंटरोलॉजी विभाग आणि गॅस्ट्रो सर्जरी, कार्डिओलॉजी विभाग, कार्डिओलॉजी सर्जरी विभाग, न्युरोलॉजी आणि न्युरोसर्जरी विभाग, युरोलॉजी आणि युरोसर्जरी असे विभाग सुरू केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा