बिस्किटे खाऊ नका, ती आरोग्याला घातक आहेत!

  Mumbai
  बिस्किटे खाऊ नका, ती आरोग्याला घातक आहेत!
  मुंबई  -  

  सकाळी उठून चहा घ्यायचा आणि त्यासोबत कुठले तरी बिस्किट खायचे हा आपला रोजचा दिनक्रम असू शकतो. पण, तुम्हाला माहीत आहे का? दररोज बिस्किट खाणं आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे? आयुर्वेदानुसार बिस्किट हा आरोग्यासाठी घातक असा पदार्थ आहे. बिस्किट हा शिळा पदार्थ आहे, असे आयुर्वेदानुसार सांगण्यात आले आहे आणि हा पदार्थ आपण रोज पैसे देऊन विकत घेतो.

  बिस्किट हा पदार्थ इंग्रजांनी भारतात आणला. आताच्या घडीला भारतात बिस्किटाचे मार्केट 25 हजार कोटी एवढे आहे. म्हणजेच एवढ्या भल्या मोठ्या रकमेची बिस्किटे भारतीय दरवर्षी खातात. नेहमी बिस्किट खाल्ल्याने अॅसिडिटी, अपचन, दमा, मूळव्याध, मधुमेह, मलावष्टंभ, स्थूलता यासारखे आजार होऊ शकतात. तसेच आधीपासून ज्यांना हे आजार आहेत, त्यांनी बिस्किटांपासून दूरच राहावे असा सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञ देतात.

  जगात सगळीकडे मैद्यापासून बिस्किटे बनवली जातात. सकाळी आणि संध्याकाळी चहा बरोबर बिस्किट खाल्ले, तर ते खरंच आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे सकाळी चांगला नाश्ता करणे गरजेचे आहे. चहातले दूध आणि बिस्किटामधला मैदा यांचे गुणधर्म परस्पर विरोधी आहेत. त्यामुळे ते शरीराला पूरक नाहीत. मी स्वत: एका शेफशी बोललो आहे. त्याने मला सांगितले की, मैद्याशिवाय कुठलेच बिस्किट तयार केले जाऊ शकत नाही. आणि जे लोक विना मैद्याचे बिस्किट असल्याचा दावा करतात, ते लोक आपल्या शरीराशी खेळतात.

  डॉ. परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पती

  बिस्किटांबाबतची काही तथ्ये - 

  • दूध - बिस्किट किंवा चहा - बिस्किट हा सकाळच्या नाश्त्याला पर्याय होऊच शकत नाही. मुलांना भूक लागलेली असताना पोहे, उपमा, शिरा, फळे असे पौष्टिक पदार्थ द्यावेत
  • सर्वच बिस्किटांमध्ये मैदा वापरलेला असतो. हा मैदा पचायला जड आणि पोटात चिटकून बसणारा आणि आरोग्याला अपायकारक आहे
  • बिस्किटातील प्रोटीन्स, मिनरल्स इ. हा जाहिरातबाजीचा विषय आहे
  • शरीरात फायबरसाठी बिस्किटे खाणे चुकीचे आहे
  • पालेभाज्या, फळे, गव्हाचा कोंडा, डाळींची टरफले, सलाद यातून आवश्यक फायबरची पूर्तता होते
  • सर्वच बिस्किटांमध्ये डालडा तूप असते जे बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी कारणीभूत ठरते
  • गाईचे तूप खायला सांगितल्यावर कॉलेस्ट्रॉल वाढेल म्हणून बरेच जणं नाक मुरडतात
  • डाएबिटीजसाठी असणारी बिस्किटे हा तर गैरसमज असल्याचे आयुर्वेदिक तज्ज्ञांचे मत आहे 
  • ब्रेड, खारी टोस्ट हे बेकरीचे पदार्थ बिस्किटासारखेच अपायकारक आहेत

  बिस्किट हा क्वचित, एखाद्या वेळी, चवीसाठी, प्रवासात सोय म्हणून खाण्याचा पदार्थ आहे. पण, जर तुमचा चहा बिस्किटांशिवाय पूर्ण होत नसेल, तर हे आरोग्यासाठी घातक आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.