Advertisement

मेट्रो रेल्वेवरून शिवसेना-भाजपा एकमेकांवर घसरले


मेट्रो रेल्वेवरून शिवसेना-भाजपा एकमेकांवर घसरले
SHARES

मुंबईत सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाला विरोध मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मेट्रोमुळे मुंबईत खड्डे होत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेने आता या मेट्रोमुळेच मुंबईची वाट लागली असल्याचा जोरदार आरोप केला. मेट्रोमुळे झाडांची कत्तल आणि प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आहेच, शिवाय या प्रकल्पामुळे आता लोकांची सुखाची झोपच मोडली गेल्याचा आरोप करत शिवसेनेने पुन्हा एकदा मेट्रोच्या मनमानी कारभाराला विरोध केला. मेट्रो रेल्वेचे काम सुरळीत सुरू असल्याचे सांगत भाजपाने मेट्रो रेल्वेच्या कारभाराचे कौतुक केले. त्यामुळे या प्रकल्पामुळे शिवसेना आणि भाजपा एकमेकांवर घसरल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई मेट्रो टप्पा 2 अ अंतर्गत इलेक्ट्रिक सब स्टेशन (उपकेंद्र) या करता अंधेरी येथील 400 चौरस मीटरचा पंपिंग स्टेशनकरता आरक्षित भूभाग देण्याचा सरकारकडून आलेला प्रस्ताव प्रशासनाने सुधार समितीपुढे मंजुरीसाठी आणला होता. मात्र, याठिकाणी मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत पंपिंग स्टेशनची ही जागा देण्यास सुधार समितीने विरोध दर्शवला. भाजपाच्या वतीने ही जागा देण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. पण शिवसेना आणि काँग्रेसच्या सदस्यांनी मेट्रो रेल्वे प्रकल्पापेक्षा मुंबईच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मुंबई मलनिःसारण प्रकल्प हाही तेवढाच महत्त्वाचा असल्यामुळे ही जागा दिली जावू नये अशी सूचना केली. त्यामुळे सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी हा प्रस्ताव नामंजूर करून सरकारच्या मागणीचा प्रस्ताव फेटाळून लावला.

काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी ही जागा एमएमआरडीएला दिल्यानंतर याठिकाणी पंपिंग स्टेशन जर उर्वरीत जागेत बनवायचे झाल्यास महापालिका यासाठी भूखंड खरेदी करणार का? असा प्रश्न उपस्थित करत याला विरोध केला.

तर रात्रीच्यावेळी मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे लोकांची रात्री झोपमोड होत आहे. दुकानांच्या बाहेर खणून तसेच बॅरिकेट्स लावल्यामुळे त्यांचाही धंदा होत नाही. या प्रकल्पांतर्गत कापली जाणारी झाडे गोरेगावला लावणार म्हणतात. मग आमच्या लोकांनी काय ऑक्सिजन घ्यायला गोरेगावला जायचे का? असा प्रश्न माजी महापौर विशाखा राऊत यांनी विचारला आहे.


मेट्रो झाली नाही म्हणून फरक पडणार नाही

मेट्रोमुळे लोकांना त्रास होत असल्याचे सांगत 'ही मेट्रो झाली नाही म्हणून काही फरक पडणार नाही', असे माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी सांगितले. शांतताक्षेत्रांमध्ये मोठ्या आवाजात खोदाईचे काम सुरू आहे. आमच्या सणांना शांतता क्षेत्रात आवाजाची बंदी मग या प्रकल्पाचा आवाज चालतो कसा असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या 350 कुटुंबांना कुर्ल्यात स्थलांतरीत केले. पण याठिकाणी या प्रकल्पामुळे पाणी तुंबून लोकांच्या घरात पाणी जात असल्याचे सांगितले.

शिवसेनेचा मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला विरोध नाही तर त्यांच्या मनमानीला विरोध आहे. या मेट्रोमुळे शहराची वाट लावली असल्याचा आरोप शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी बेस्टला सक्षम करणे हेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावर भाजपाचे प्रकाश गंगाधरे यांनी बेस्टची जी हालत झाली आहे, याला आपणच जबाबदार असल्याचे आजवर अध्यक्ष कुणाचे होते, असा सवाल करत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

मेट्रो रेल्वे प्रकल्प जसा महत्त्वाचा आहे, तसेच पंपिंग स्टेशनही तेवढेच महत्त्वाचे आहे, असे सांगत माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी भविष्यात पाणी तुंबू नये, यासाठी पंपिंग स्टेशनची गरज असल्याचे स्पष्ट करत हा आरक्षित भूखंड दिला जावू नये, अशी भूमिका मांडली. यावेळी झालेल्या चर्चेत महादेव शिवगण, ज्योती अळवणी आदींनी भाग घेतला. त्यामुळे हा आरक्षित भूखंड पंपिंग स्टेशनकरता आवश्यक असल्यामुळे त्याचे आरक्षण बदलून चालणार नाही. त्यामुळे हा प्रस्ताव नामंजूर करत सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावला.


13 भूखंडांचा प्रस्ताव ठेवला राखून

मेट्रो प्रकल्प 2 साठी शहरातील एकूण 13 भूखंड कायम तसेच तात्पुरत्या स्वरुपात एमएमआरडीएला देण्यासाठी आलेला प्रस्ताव सुधार समितीने राखून ठेवला. 13 भूखंडांपैकी चार भूखंडांमधील काही भाग हे कायमस्वरुपी घेतले जाणार आहे, तर 11 भूखंड हे तात्पुरत्या स्वरुपात देण्याची मागणी एमएमआरडीएने केली होती. पण या भूखंडांची पाहणी करण्यासाठी हा प्रस्ताव राखून ठेवला.


हेही वाचा -

'मेट्रो'मुळे मुंबईचा विकास... पण कोणत्या किंमतीवर?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा