Advertisement

भाजपाकडून आता पक्षी वाचवा अभियान


भाजपाकडून आता पक्षी वाचवा अभियान
SHARES

वाढत्या उकाड्याने मुंबईकरांना हैराण केलं आहे. या उकाड्यामुळे घामाने अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाच्या या तडाख्यामुळे बाहेर फिरणंही मुश्किल होऊन बसलं आहे. अशा या वाढलेल्या उन्हाच्या पाऱ्यामुळे आपला जीव व्याकूळ होत असतो, मग या उन्हात पक्ष्यांचं काय होत असेल? या पक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी पिता यावं यासाठी भाजपा पक्षी बचाव अभियान हाती घेत घरोघरी बाल्कनीत पाण्याची कुंड नागरिकांना भेट देत आहे. विलेपार्ले आणि सांताक्रूझ या भागांमध्ये तब्बल २५ हजार पाण्याची कुंड मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत.


पक्षी बचाव अभियान

विलेपार्ले कल्चरल सेंटर आणि भाजपाच्या माध्यमातून पक्षी बचाव अभियान हाती घेऊन उन्हाच्या तडाख्याचा फटका पक्ष्यांना बसू नये याकरता त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था घरोघरी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी भाजपाचे आमदार अॅड पराग अळवणी, विलेपार्ले कल्चरल सेंटरचे अध्यक्ष प्रवीर कपुर आणि उत्तर मध्य मुंबईचे भाजपा सरचिटणीस कृष्णा पारकर यांनी यासाठी विभागात पाण्याची कुंड नागरिकांना निशुल्क उपलब्ध करून दिली आहेत.


'प्राणी-पक्ष्यांवर दया करा'

उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांचा तडफडून मृत्यू होतो. ही बाब लक्षात घेऊन त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी प्राणी-पक्ष्यांवर दया करा, असं आवाहन करत नागरिकांना पाणी ठेवण्यासाठी कुंड उपलब्ध करून दिली जात आहे. विलेपार्ले आणि सांताकुंझ भागात अशाप्रकारे २५ हजार पाण्याची कुंड उपलब्ध करून दिली जात असल्याचे भाजपाचे माजी नगरसेवक कृष्णा(महेश) पारकर यांनी सांगितलं.

प्रभाग क्रमांक ८७ मधील प्रभात कॉलनीसह इतर भागांमध्ये १ हजार पाणी कुंडांचं वाटप केलं जाणार आहे. ही पाण्याची कुंड नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा