Advertisement

मुंबईच्या रस्त्यांचे पैसे खातोय कोण?

पावसाळ्यापूर्वी बनवण्यात आलेले रस्ते पावसाळ्यानंतर वाहून गेले असून रस्त्यांच्या वरील भागातील थर काढून केल्या जाणाऱ्या कामांमुळे करदात्यांचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जात असल्याचाही आरोप स्थायी समिती सदस्यांनी केला आहे.

मुंबईच्या रस्त्यांचे पैसे खातोय कोण?
SHARES

मुंबईतील विकासकामांची टक्केवारी नगरसेवक घेत असल्याचा आरोप यापूर्वी प्रशासनाकडून झालेला असतानाच आता रस्त्यांच्या कामांची कंत्राटे ही प्रशासनाला पैसे खायचे असल्यामुळे काढली जात असल्याचा गौप्यस्फोट स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. पावसाळ्यापूर्वी बनवण्यात आलेले रस्ते पावसाळ्यानंतर वाहून गेले असून रस्त्यांच्या वरील भागातील थर काढून केल्या जाणाऱ्या कामांमुळे करदात्यांचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जात असल्याचाही आरोप स्थायी समिती सदस्यांनी केला आहे.


पावसाळ्यापूर्वी केलेली कामे गेली वाहून!

पश्चिम उपनगरातील कांदिवली ते दहिसर दरम्यानच्या रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव मंजुरीला आला असता काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांनी पावसाळ्यापूर्वी केलेल्या रस्त्यांची कामे वाहून गेल्याचा आरोप केला आहे. खड्डे पडणाऱ्या रस्त्यांचा वरील थर काढून केल्या जाणाऱ्या विकासात केवळ एकच वर्षाचा हमी कालावधी असतो. परंतु, यातच ही कामे वाहून जात असल्यामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात जात असल्याचा आरोप झकेरिया यांनी केला.


काळ्या यादीतील कंत्राटदारच करतात कामं!

रस्त्यांच्या कामांमध्ये स्थायी समिती गंभीर नसल्याचा आरोप करत सपाचे रईस शेख यांनी सध्या ज्या कंत्राटदारांना कामे दिली आहेत, ती कामे या कंत्राटदारांच्या आडून काळ्या यादीतील कंत्राटदार असलेल्या आरपीएस, मधानी यासारख्या कंपन्या करत असल्याचा आरोप केला. रस्त्यांचे टेंडर हे स्थायी समितीत मंजूर केले जात असले, तरी प्रशासन पैसे खाण्यासाठी हे टेंडर काढत असल्याचा आरोप शेख यांनी केला.


सहा महिन्यांपासून रखडले रस्त्याचे काम

माटुंगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाचे काम सहा महिन्यांपासून रखडले आहे. वाहतूक विभागाकडून परवानगी मिळत नसल्याची तक्रार महापालिकेचे अधिकारी मांडत असल्याची खंत भाजपाच्या राजेश्री शिरवाडकर यांनी मांडली. तर कांदिवली ठाकूर व्हिलेज आणि ठाकूर कॉम्प्लेक्समधील रस्त्यांची कामेच वाहून गेल्याची तक्रार भाजपाच्या सुनिता यादव यांनी मांडली.


महापालिका प्रशासनाचं 'प्रमोशन अॅण्ड लाँचिंग'!

महापालिका प्रशासन हे 'प्रमोशन अॅण्ड लाँचिंग' करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी हे प्रशासन सर्वच विकासकामांमध्ये अपयशी ठरल्याचे सांगितले. मागील अर्थसंकल्पात हाती घेतलेली कामे अजूनही अर्धवटच असून आतापर्यंत हाती घेतलेल्या रस्त्यांची काय स्थिती आहे? याची माहिती समोर आणावी, अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली.


रस्ता घोटाळ्याच्या अहवालाचं काय?

प्रशासनाची मानसिक वेगळी असून आपण चर्चा करून वेळ वाया घालवत आहे. अजूनही रस्ता घोटाळ्यातील दुसऱ्या टप्प्यातील अहवाल सादर करून कारवाई केलेली नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्त पारदर्शी शब्द उच्चारत असले तरी ते पारदर्शी कारभार करत नसल्याचा आरोप केला. यावेळी सदस्यांनी केलेल्याची सूचनांची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रशासनाला दिले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा