Advertisement

शिट्टी वाजवा, सिटी वाचवा..!


शिट्टी वाजवा, सिटी वाचवा..!
SHARES

एका अनोख्या कल्पनेतून जनतेला साद घालत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणाऱ्या गोरेगावातील उपक्रमाची सर्वच स्तरातून चर्चा होत आहे. एखादी व्यक्ती कुंडीच्या बाहेर कचरा टाकताना दिसल्यास किंवा उघड्यावर शौच करताना दिसल्यास शिट्टी वाजवून त्यांना तसे करण्यापासून रोखा, असा संदेश घरोघरी पोहोचवून गोरेगाव पश्चिमेकडील स्थानिकांनी शहरात नवा पायंडा पाडला. 2015 साली 'स्वच्छ भारत अभियान, गोरेगाव एएलएम' स्थापन करून त्याअंतर्गत शिट्टी वाजवा, सिटी वाचवा..! ही अनोखी मोहीम स्थानिकांनी हाती घेतली. सलग तीन महिने ही मोहीम राबवून स्थानिक कार्यकर्त्यांनी विभाग स्वच्छ आणि सुंदर बनविण्यास मोठा हातभार लावला. एवढेच नव्हे, तर परिसर रोगराईपासून मुक्त ठेवण्यातही मदत झाली.

एखाद्या विषयाचा प्रचार आणि प्रसार करायचा झाल्यास आजच्या जमान्यात सोशल मीडियाची मदत घेतली जाते. हा अत्यंत प्रभावी मार्ग असल्याने गोरेगावातील 'स्वच्छ भारत अभियान, एएलएम' नेही हाच मार्ग अवलंबिला. या 'एएलएम'च्या सदस्यांनी 'लोकसर्कल' नावाने संकेतस्थळ तयार करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काय करता येईल? त्यासाठी मार्ग कुठले? याची माहिती देऊन रहिवाशांना एकवटण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर लोकांनी स्वत: पुढाकार घेऊन 'शिट्टी वाजवा, सिटी वाचवा' हे आंदोलन हाती घेतले.

स्थानिकांच्या या प्रयत्नांना महापालिकेनेही चांगली साथ दिली. 'स्वच्छ भारत अभियान, गोरेगाव एएलएम'चे सदस्य आणि महापालिकेच्या सहभागातून परिसरातील नागरिकांना कचराकुंड्या वाटण्यात आल्या. जवाहर नगर रस्ता क्रमांक 1 पासून त्याला सुरूवात झाली. नागरिकांनाही कचरा कुंड्यामध्येच टाकण्यास सुरूवात केल्यानंतर परिसर स्वच्छ दिसू लागला. 'शिट्टी वाजवा, सिटी वाचवा' आंदोलनाला लोकांनीही चांगली साथ दिली. असे 'स्वच्छ भारत अभियान, गोरेगाव , एएलएम' चे अध्यक्ष स्नेहल पारीख यांनी सांगितले.

विभागातून आता कचराकुंड्या नाहीशा झाल्या आहेत. स्वच्छतेपाठोपाठ आता 'एएलएम'चे सदस्य विभाग सुंदर करण्याकडे भर देत आहेत. तरूणांचा यांत उत्स्फूर्त सहभाग असून ते लवकरच नवा कार्यक्रम हाती घेणार आहेत, अशी माहिती 'स्वच्छ भारत अभियान, गोरेगाव, एएलएम' चे सचिव विवेक याजनिक यांनी दिली.

'स्वच्छ भारत अभियान, गोरेगाव, एएलएम' मध्ये एकूण 388 इमारती आहेत. त्यात जवळपास 15 हजार रहिवासी राहतात. येथून दररोज किमान 21 लाख 78 हजार किलो कचरा काढण्यात येतो. यापैकी 15 लाख 24 हजार किलो कचरा ओला, तर 6 लाख किलो कचरा सुका असतो. या 'एएलएम'द्वारे बरेच नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे विभाग स्वच्छ आणि सुंदरतेकडे वाटचाल करत असल्याची प्रतिक्रिया महापालिकेचे 'एएलएम' अधिकारी सुभाष पाटील यांनी दिली.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर, अनोखी कल्पना आणि तरूणांच्या साथीने हा विभाग लवकरच कात टाकेल, अशी अपेक्षा आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा