मुंबई महापालिकेच्या ७ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई महापालिकेच्या सात सहाय्यक आयुक्तांची बदली करण्यात आली. करनिर्धारण आणि संकलन तसेच निवडणूक विभागाचे प्रमुख संजोग कबरे आणि बाजार व नियोजन विभागाचे सहायक आयुक्त संजय कुऱ्हाडे यांना अनुक्रमे मालाड पी उत्तर आणि कांदिवली आर दक्षिण या विभागाची जबाबदारी सोपवली आहे.

SHARE

मुंबई महापालिकेच्या सात सहाय्यक आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. याचबरोबर ज्या दोन सहाय्यक आयुक्तांकडे खात्याचा प्रमुखपदाचा भार सोपवला होता, त्यांना आता पुन्हा विभागात पाठवले आहे. करनिर्धारण आणि संकलन तसेच निवडणूक विभागाचे प्रमुख संजोग कबरे आणि बाजार व नियोजन विभागाचे सहायक आयुक्त संजय कुऱ्हाडे यांना अनुक्रमे मालाड पी उत्तर आणि कांदिवली आर दक्षिण या विभागाची जबाबदारी सोपवली आहे.


सात सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

पावसाळा संपताच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सहायक आयुक्तांची खांदेपालट केली. चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या सहायक आयुक्तांना खात्यांची जबाबदारी सोपवून त्यांची उपयुक्तता कमी केली जात आहे, अशी टीका होत असताना दिवाळी पूर्वीच आयुक्तांनी बदली फटाके फोडत काहींना गोड तर काहींना कडू बातमी दिली आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ९ ऑक्टोबरला सात सहायक आयुक्तांच्या बदल्यांचे ऑर्डर काढले.


कोणाची बदली कुठे केली?

  • या बदली ऑर्डरमध्ये पी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांची बदली नियोजन आणि बाजार विभागात केली.
  • डी विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास क्षीरसागर यांची बदली करनिर्धारण व संकलन विभागाच्या प्रमुखपदी केली.
  • एफ/ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांची बदली ग्रँट रोडच्या डी विभागात केली आहे
  • कंदिवलीच्या आर/ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड यांना भायखळा येथील ई विभागाची जबाबदारी सोपवली आहे.


सभागृह नेत्यांच्या रोषाचे बळी

भायखळा येथील ई विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त म्हणून काम सांभाळणारे किशोर देसाई यांची बदली करण्यात सभागृहनेते यशवंत जाधव यांना यश आले. किशोर देसाई यांना या विभागातून त्वरित हटवले जावे, अशी मागणी जाधव यांनी स्थायी समितीत तसेच आयुक्तांकडेही केली होती. त्यामुळे अखेर किशोर देसाई यांना येथून हटवून एफ/दक्षिण विभाग कार्यालयात पाठवण्यात आले आहे.


हेही वाचा - 

पैसे घेऊन पोलिस अधिकाऱ्यांची बदली करून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


संबंधित विषय