विकासाच्या नावाखाली झाडांची सर्रास कत्तल होत असल्यामुळे मुंबईचे रुपांतर सिमेंटच्या जंगलात झाले आहे. खासगी इमारतीचे बांधकाम असो किंवा सार्वजनिक प्रकल्प तेथे तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात कंत्राटदारांकडून इतरत्र नवीन झाडांची लागवड करण्यात महापालिका पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे महापालिकेने आता झाडे लावण्यासाठी जनतेलाच पुढाकार घेण्याचे आवाहन केले असून विनामूल्य आंबा, चिकू, पेरू, जांभूळ, आवळा इत्यादी झाडांची रोपटी देण्याची तयारी दाखवली आहे.
ज्या सोसायटींना वा नागरिकांना आपल्या सोसायटीच्या परिसरात वृक्षारोपण करायचे असेल, त्यांना दरवर्षी पावसाळ्यादरम्यान महापालिका अत्यल्प दरात झाडांची रोपटी उपलब्ध करुन देते. मात्र यंदा 1 ते 7 जुलै दरम्यान महापालिका ही रोपटी पूर्णपणे विनामूल्य देणार आहे. ज्या सोसायटींमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक झाडे लावायची असतील, त्या सोसायटींमध्ये उद्यान विभाग मोफत झाडांचे शास्त्रीय पद्धतीने रोपण देखील करून देणार असल्याचे उपायुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांनी सांगितले.
शहरात फळझाडांची संख्या कमी झाल्याने पक्ष्यांना खाण्यासाठी पुरेशी फळे मिळत नाहीत. त्यामुळेच महापालिका सोसायट्यांना मोफत रोपटी देताना जांभूळ, पेरु, गावठी-आंबे, टेंभूर्णी, आवळा, चिकू, भोकर अशा फळझाडांची रोपटी प्रामुख्याने देणार आहे. जेणेकरुन भविष्यात पक्ष्यांना खाण्यासाठी फळांची उपलब्धता वाढेल.
तामण हे महाराष्ट्राचे राज्य पुष्प आहे. या झाडाच्या बिया पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे तामण या प्रचलित अर्थाने फळझाडे नसणाऱ्या झाडाचाही समावेश या यादीत केला असल्याची माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. 'मलबार हिल' येथे महापालिका मोठ्या प्रमाणात फळझाडे लावणार आहे.
त्यामुळे 1 ते 7 जुलै दरम्यान ज्या सोसायटींना परिसरात वृक्षारोपण करायचे असेल त्यांनी विनामूल्य रोपटी घेण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
2014 ते 2016 मध्ये कापलेल्या झाडांची संख्या
कापलेली झाडे : 7842
पुनर्रोपित झाडे :13,070
फांद्या छाटलेली झाडे :28,787
तीन वर्षातील लावलेल्या झाडांची संख्या
सन 2014 : 14,253
सन 2015 : 16,157
सन 2016 : 18,650