Advertisement

मालाडचा शांताराम तलावाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर, शिवसेनेचा भाजपाला झटका


मालाडचा शांताराम तलावाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर, शिवसेनेचा भाजपाला झटका
SHARES

मालाडमधील कुरारगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शांताराम तलाव) या तलावाची दुरुस्ती आणि सुशोभिकरण करण्याच्या प्रस्तावाला भाजपाचा तीव्र विरोध आहे. हा विरोध असताना स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेनं विरोधकांच्या मदतीनं हा प्रस्ताव मंजूर करून भाजपाला जोरदार झटका दिला आहे. या तलावाचं काम रोखण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकाने मुख्यमंत्र्यांपासून ते आयुक्तांपर्यंत तसेच आपल्या सदस्यांच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न केला होता. पण ज्या मुद्द्यावर भाजपानं विरोध केला होता, तेच मुद्दे शिवसेनेसह विरोधक आणि प्रशासनानेही खोडून काढत हा प्रस्ताव मंजूर केला.


'याचा खुलासा करा'

मालाड कुरार गाव येथील शंकरबुवा साळवी मैदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव (शांताराम तलाव) यांच्या दुरुस्ती आणि सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मागील स्थायी समितीपुढे मंजुरीला आला होता. यावर भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी तीव्र विरोध करत हे बांधकाम करताना पर्जन्य जलवाहिनी आणि मलनि:सारण प्रचालन यांचे अभिप्राय घेतले आहेत का, याचा खुलासा करण्याची मागणी केली होती. तर भाजपाचे मनोज कोटक यांनी तलावामध्ये सांडपाणी येणार असेल तर दुरुस्ती करून उपयोग काय?, असा प्रश्न उपस्थित केला होता. पण यावर प्रशासनाने आपलं अभिप्राय देत मलनि:सारण वाहिनी टाकण्याचं काम लवकरच हाती घेण्यात येत असल्याचं सांगितलं.


तरीही प्रस्ताव मंजूर

यावर पुन्हा प्रभाकर शिंदे आणि मनोज कोटक तसेच अभिजित सामंत यांनी मुद्दे उपस्थित करत या प्रस्तावाला विरोध करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी मिठी नदीच्या परिसर सुशोभित करण्याचा प्रस्ताव याच समितीत मंजूर करण्यात आला. त्यावेळी यामध्ये मलनि:सारण वाहिन्यातील मल अजूनही सोडला जात आहे, ही बाब निदर्शनास आणून देऊनही तो प्रस्ताव मंजूर केला. तर मग शांताराम तलावाच्यावेळी हा मुद्दा कसा आठवतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


भाजपाचा विरोध

याला शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी पाठिंबा देत शांतारात तलावाच्या कामात मलवाहिनी टाकण्याचं काम हाती घेण्यात येत असल्याचं म्हटल्याची आठवण करून दिली दिली. यावर अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनीही मलवाहिनी टाकण्याबरोबरच तलावातील पाणी शुद्ध करण्यासाठी शुद्धीकरण यंत्र बसवण्यात येणार आहे. शिवाय पाण्याचं सुशोभिकरण करण्यात येत असल्याचं सांगितलं. त्यामुळे अखेर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी हा प्रस्ताव मतास टाकला असताना भाजपाचा विरोध वगळता सर्वांनीच याला पाठिंबा दर्शवल्यामुळे बहुमताच्या आधारे हा प्रस्ताव मंजूर केला.

विशेष म्हणजे हा प्रस्ताव मंजूर व्हावा, म्हणून भाजपाचे विनोद मिश्रा यांनी मुख्यमंत्र्यांकडून दबाव आणला होता. पण हा प्रस्ताव आपण स्थायी समितीला पाठवला असून तुम्ही तो तिथे रोखा, असं आयुक्तांनी सांगितलं होतं. पण हा प्रस्ताव स्थायी समितीतही रोखता आलेला नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा