Advertisement

मिनी रोबो करणार भूमिगत पर्जन्यजल वाहिन्यांची साफसफाई

ब्रिटीशकालीन पर्जन्यजल वाहिन्यांची लांबी ३६ किमी तर पाईप असणाऱ्या पर्जन्यजल वाहिन्यांची लांबी ३४ किमी आहे. वाहिन्यांचा या छोट्या आकारामुळे अनेकदा वाहिन्यांमध्ये विषारी वायू असण्याची सर्वाधिक शक्यता असते. हीच बाब लक्षात घेत पर्जन्यजल वाहिन्या खात्याकडून या वाहिन्यांची साफसफाई करताना विशेष काळजी घेतली जाते.

मिनी रोबो करणार भूमिगत पर्जन्यजल वाहिन्यांची साफसफाई
SHARES

मुंबईतील ब्रिटीशकालीन भूमिगत पर्जन्यजल वाहिन्यांची साफसफाई म्हणजे मुंबई महानगर पालिका आणि या विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत अवघड काम.  मुंबईत अशा ७० किमी लांबीच्या भूमिगत पर्जन्यजल वाहिन्या असून या वाहिन्यांची लांबी लक्षात घेता त्यामध्ये विषारी वायू असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या भूमिगत पर्जन्यजल वाहिन्यांच्या साफसफाईचे काम पालिकेसाठी आणखीच अवघड होते. पण आता मात्र पालिकेचं हे काम अत्यंत सोपं आणि सहज होणार आहे. कारण हे काम आता पालिकेचे कर्मचारी नव्हे तर चक्क मिनी रोबो करणार आहे. 


२ रोबो आणले

पालिकेनं अत्याधुनिक असे रिमोट कंट्रोलच्या मदतीने नियंत्रित करता येणारे २ मिनी रोबो या कामासाठी आणले आहेत. त्यामुळे आता यापुढे भूमिगत पर्जन्यजल वाहिन्यांची साफसफाई केली जाणार असल्याची माहिती पर्जन्यजल वाहिनी खात्याचे अभियंता श्रीकांत कावळे यांनी दिली आहे.


साफसफाई रिस्की 

ब्रिटीशकालीन पर्जन्यजल वाहिन्यांची लांबी ३६ किमी तर पाईप असणाऱ्या पर्जन्यजल वाहिन्यांची लांबी ३४ किमी आहे. वाहिन्यांचा या छोट्या आकारामुळे अनेकदा वाहिन्यांमध्ये विषारी वायू असण्याची सर्वाधिक शक्यता असते. हीच बाब लक्षात घेत पर्जन्यजल वाहिन्या खात्याकडून या वाहिन्यांची साफसफाई करताना विशेष काळजी घेतली जाते. त्यानुसार मॅनहोलमध्ये सक्शन पाईप टाकून शक्य ती साफसफाई करण्याचा पालिकेचा कल असतो. एकूणच ही साफसफाई करणं अवघड, रिस्की असतचं. पण त्याचवेळी अनेकदा या पद्धतीमुळं वाहिन्या योग्य प्रकारे साफ होत नाहीत. परिणामी पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही.


साफसफाईसाठी वर्गवारी 

या सर्व अडचणींवर राणबाण उपाय म्हणून पालिकेनं मिनी रोबोचा पर्याय पुढे आणला आहे. त्यानुसार या मिनी रोबोच्या माध्यमातून पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यानंतर अशी पर्जन्यजल वाहिन्यांची साफसफाई केली जाते. ज्या भागात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अधिक काळ लागतो त्यानुसार विभागाची वर्गवारी ठरवत प्राधान्यक्रमाने त्या त्या भागातील पर्जन्यजल वाहिन्यांची साफसफाई केली जाणार आहे. तशी वर्गवारी पालिकेनं ठरवली आहे. 


प्राधान्यक्रमाने सफाई

प्राधान्यक्रम १ अंतर्गत ए विभागातील शहीद भगतसिंग  मार्ग, बी विभागातील मियाँ अहमद छोटाणी मार्ग, सी विभागातील किका रस्ता, डी विभागातील बाॅडीगार्ड लेन ई विभागातील जहाँगिर बोमन बेहराम मार्ग एफ-दक्षिण विभागातील मडके बुवा चौक ते श्रावण यशवंत चौक इत्यादी भागातील पर्जन्यजल वाहिन्यांची साफसफाई मिनी रोबोमार्फत केली जाणार आहे. ही साफसफाई झाल्यानंतर इतर भागातील पर्जन्यजल वाहिन्यांची साफसफाई करण्यात येणार आहे.


आणखी एक रोबो

पालिकेने २ मिनी रोबो सध्या खरेदी केले असून लवकरच आणखी एक मिनी रोबो पालिकेच्या ताब्यात दाखल होणार आहे. हे मिनी रोबो जलरोधक असल्याने आणि आकाराने लहान असल्याने ते वाहिनीत सहज काम करू शकणार आहेत. तसंच २८० अश्वशक्तीच्या वाहनावरील पंपाला हे यंत्र जोडलेले असल्याने ते तेवढ्याच ताकदीनं गाळ खेचून घेऊ शकणार आहेत. 


जनित्राचा वापर

मिनी रोबोला चालवण्यासाठी जनित्राचा वापर केला जाणार आहे. तर या यंत्रावर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे रोबोला कुठं आणि कसं वळायचं हे दूरनियंत्रक चालकास समजणं सोपं होणार आहे. रोबोद्वारे ओढून घेतला जाणारा गाळ हा बाहेर असलेल्या टँकरच्या टाकीत साठवला जाणार आहे. पुढे त्या गाळाची योग्य ती विल्हेवाट लावली जाणार आहे.  पावसाळ्यापूर्वी हे तिन्ही मिनी रोबो मुंबईतील पर्जन्यजल वाहिन्यांची साफसफाई पूर्ण करतील असा दावा पालिकेनं केला आहे. हेही वाचा - 

प्रेमाच्या शोधात पाकिस्तानात गेलेला हमीद ६ वर्षांनी मुंबईत परतणार

एनसीएलएटीचा पत्राचाळ बिल्डरला दणका; गोरेगावमधील पत्राचाळीची जागा म्हाडाचीच
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा