अकार्यक्षम २०९ 'एएलएम'ची नोंदणी रद्द

नेमून दिलेल्या मुदतीत ज्या ‘एएलएम’नी कामांत प्रगती केली नाही, अशा २०९ 'एएलएम'ची नोंदणी महापालिकेने रद्द केली आहे.

SHARE

मुंबईतील कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावता यावी, यासाठी महापालिकेच्यावतीने विविध प्रभागांमध्ये 'प्रगत परिसर व्यवस्थापन' अर्थात 'एएलएम'ची निवड करण्यात आली आहे. परंतु मुंबईत कार्यरत ७१९ ‘एलएमएम’पैकी केवळ १४५ 'एएलएम'ची कामगिरीच चांगली असल्याने नेमून दिलेल्या मुदतीत ज्या ‘एएलएम’नी कामांत प्रगती केली नाही, अशा २०९'एएलएम'ची नोंदणी महापालिकेने रद्द केली आहे.


१९९७ पासून सुरूवात

ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण सोसायटी स्तरावर व्हावं, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती व्हावी तसेच महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचं प्रमाण कमी होऊन कचरा व्यवस्थापन साध्य व्हावं यासाठी नोव्हेंबर १९९७ पासून 'एएलएम' उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.


कामांची तपासणी

परंतु यासाठी निवडलेल्या ‘एएलएम’ प्रत्यक्षात कार्यरत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्याची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सर्वच ‘एएलएम’च्या कार्यक्षमतेची व करीत असलेल्या कामांची तपासणी करण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यानुसार सर्व 'एएलएम'च्या कामांची तपासणी केल्याची माहिती उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली.


नवीन 'एएलएम'ची नोंदणी

कचरा व्यवस्थापनाचं काम न करणाऱ्या २०९ 'एएलएम' नोंदणी रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यात १९१ 'एएलएम' घनकचरा क्षेत्रात कार्यरत नसल्याचं आढळून आलं. तर १८ ‘एएलएम’ कार्यरत असल्या तरी त्यांचं काम समाधानकारक नसल्याचं आढळून आल्याचं बालमवार म्हणाले. या २०९ ‘एएलएम’ची नोंदणी रद्द करुन त्यांच्या जागी नवीन ‘एएलएम’ची नोंदणी सुरु केल्याचंही बालमवार यांनी स्पष्ट केलं.


या 'एएलएम' पुढे

समाधानकारक काम करणाऱ्या १४५ ‘एएलएम’ संस्थांपैकी सर्वात जास्त संख्या ‘एच पश्चिम’ या विभागात आहे. या विभागात ३८ ‘एएलएम’ चांगले काम करीत असून ‘के पश्चिम’ १९, एम पश्चिम’ १२, ‘आर दक्षिण’ ११, ‘एफ दक्षिण’१० अशी ही संख्या आहे. घनकचरा क्षेत्रात कार्यरत नसलेल्या 'एएलएम'ची संख्याही ‘एच पश्चिम’ मध्ये १२७ अशी आहे.


तपासणीतील आकडेवारी

  • २४ विभागात एकूण ७१९ 'एएलएम'ची नोंदणी
  • ४५६ प्रगत परिसर व्यवस्थापन कार्यरत
  • २६५ 'एएलएम' घनकचरा क्षेत्रात कार्यरत
  • १४५ 'एएलएम'चं काम समाधानकारक
  • १२० 'एएलएम'चं काम फारसं समाधानकारक नाही
  • १२० पैकी १८ 'एएलएम'चं काम असमाधानकारक
  • १०२ 'एएलएम'चा सविस्तर आढावा घेण्याचं काम सुरुहेही वाचा -

कचरा विल्हेवाटीची सक्ती म्हणजे भष्टाचाराचं नवं कुरण

कचरा विल्हेवाटीच्या जागांचा भलताच वापर! पालिका करणार कारवाईसंबंधित विषय
ताज्या बातम्या