खड्डयांसाठी खराब रस्त्यांवर 400 कोटींची मलमपट्टी

  BMC
  खड्डयांसाठी खराब रस्त्यांवर 400 कोटींची मलमपट्टी
  मुंबई  -  

  पावसाळ्यात उद्भवणाऱ्या खड्डयांच्या समस्येवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने खराब रस्त्यांची डागडुजी करून रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळयापूर्वी खराब रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी सुमारे 400 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत ते मंजूर करण्यात आले आहे.

  मुंबईतील अनेक लहान तसेच मोठ्या रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडत असतात. रस्त्यांवरील या खड्डयांमुळे नागरिकांचे हाल होत असून, कोट्यवधी रुपये खर्च करूनही खड्डयांमुळे महापलिकेला टिकेचे धनी व्हावे लागते. त्यामुळे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व विभागांच्या सहाय्यक आयुक्तांकडून खराब रस्त्यांची माहिती घेऊन प्राथमिक टप्प्यात 459 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे. यासर्व रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव स्थायी समितीत बैठकीच्या एक दिवस आधी येवूनही कोणत्याही प्रकारच्या चर्चेविना हे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तब्बल 398 कोटींच्या या सर्व प्रस्तावांना समितीने मंजूर दिली आहे. एफ/उत्तर विभागातील रस्त्यांचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाचा समावेश नसल्यामुळे भाजपाच्या नगरसेविका राजेश्री शिरवाडकर आणि प्रतिक्षा नगरमधील रस्त्याचे काम रखडल्यामुळे शिवसेना नगरसेवक मंगेश सातमकर यांनी आवाज उठवून प्रशासनाला जाब विचारला. यावेळी रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी हमी कालावधीतील रस्ते आणि प्रकल्प रस्त्यांचा समावेश यामध्ये केलेला नसल्याचे सांगितले. मात्र, नगरसेवकांनी सूचना केल्यास अत्यंत खराब रस्यांचा समावेश या कामांमध्ये केला जाईल,असेही आश्वासन त्यांनी दिले.

  परिमंडळनिहाय खराब रस्त्याची संख्या आणि त्यावर होणारा खर्च

  परिमंडळ 1 अंतर्गत रस्त्यावरील खड्डे भरणे - 146 रस्ते (55. 37 कोटी)
  परिमंडळ 2 अंतर्गत रस्त्यावरील खड्डे भरणे - 62 रस्ते (38. 65 कोटी)
  परिमंडळ 3 अंतर्गत रस्त्यांवरील खडे भरणे - 112 रस्ते (51.52कोटी)
  परिमंडळ 4 अंतर्गत रस्त्यावरील खड्डे भरणे - 63 रस्ते (47. 23 कोटी)
  परिमंडळ ७ अंतर्गत रस्त्यावरील खड्डे भरणे - 51 रस्ते (37. 75 कोटी)
  प्रभाग ‘एल’, ‘एम/ पूर्व’ व ‘एम /पश्चिम’ - 16 रस्ते (खर्च - 35.19 कोटी)
  प्रभाग ‘एन’, ‘एस’ व ‘टी’ : 19 रस्ते (खर्च - 17.88 कोटी)
  एस विभागातील लालबहादूर शास्त्रीमार्गाची सुधारणा(113.43 कोटी)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.