Advertisement

तर बेस्ट उपक्रमाची ‘गिरण’ होईल, महापालिका आयुक्त दहशतीखाली


तर बेस्ट उपक्रमाची ‘गिरण’ होईल, महापालिका आयुक्त दहशतीखाली
SHARES

तोट्यात चाललेल्या बेस्टला आर्थिक मदत करण्यासाठी महापालिकेने काटकसरीच्या उपाययोजना राबवण्याच्या शिफारशी लागू करण्यास मंजुरी दिली. आणि या शिफारशी बेस्ट समितीने मान्यही केल्या. पण महापालिकेने या उपक्रमाला आर्थिक मदत करण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नाही.


 'नाहीतर बेस्ट कामगारांचं गिरणी कामगार होईल'

आपण हे सर्व बेस्टला आर्थिक मदत करण्यासाठी नव्हेतर बेस्ट आणि बेस्टचे कामगार यांना वाचवण्यासाठी केलं असल्याचं महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केलं आहे. बेस्ट कामगारांचे गिरणी कामगार होऊ नये याचसाठी या काटकसरीच्या उपाययोजना उपक्रमाला लागू करण्याचे निर्देश दिल्याचे मेहता यांनी सांगितलं.


५५० कोटींची तूट भरून काढण्याचा बेस्टचा प्रयत्न

मुंबई महापालिका सभागृहात सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. या चर्चेतील प्रश्नांना उत्तर देताना आयुक्तांनी ही भूमिका स्पष्ट केली. बेस्टला आर्थिक काटकसरीच्या उपाययोजना सुचवून त्या शिफारशी लागू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बेस्ट समितीने काटकसरीच्या उपाययोजनांच्या शिफारशी लागू करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे एकूण ८८० कोटींच्या तुटीपैकी ५५० कोटींची तूट भरून काढण्याचा प्रयत्न बेस्टने केला आहे. मात्र, काटकसरीच्या उपाययोजना स्वीकारूनही महापालिकेकडून आर्थिक मदत करण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव, सभागृहनेते यशवंत जाधव यांनी प्रश्न उपस्थित केले होते.


तोपर्यंत बेस्ट नफ्यात येवू शकत नाही

सदस्यांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी, बेस्टला मदत करावी म्हणून सर्वस्तरावरून मागणी होत आहे. परंतु, महापालिकेकडून बेस्टला कायम मदत केली जात आहे. यापूर्वी १६०० कोटींचे कर्ज दिले आहे. परंतु, बेस्टला मदत केली तरी ते नफ्यात येणार नाही. कारण जोपर्यंत बेस्ट उपक्रम काटकसरीच्या उपाययोजना राबवत नाही तोपर्यंत बेस्ट नफ्यात येवू शकत नाही. त्यामुळे काटकसरीच्या उपाययोजना या कर्मचाऱ्यांना पगार वेळेत देता यावं, यासाठी राबवण्याच्या सूचना केल्याचे अजोय मेहता यांनी सांगितलं.

बेस्ट टिकली पाहिजे ही सर्वांचीच भावना आहे, परंतु कामगारांचे पगारच आपण देऊ शकलो नाही तर बेस्ट टिकेल का असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे जे गिरण्यांचे झाले तेच बेस्टचे होऊ नये हीच यामागची भावना होती. बेस्ट कामगारांचे गिरणी कामगार होऊ नये यासाठी काटकसरीच्या उपाययोजना राबवणे आवश्यक होते, त्यासाठीच त्यांना शिफारशी सूचवल्या होत्या, असं त्यांनी सांगितलं.


बेस्टच्या ताफ्यात येणार ४५० बस गाड्या

येत्या काही दिवसांमध्ये बेस्टच्या ताफ्यात सुमारे ४५० बस गाड्या दाखल होणार असून नवीन मार्गावरही ते धावतील. तसेच इलेक्ट्रिकवरील बसेस धावणार असल्यामुळे इंधन कमी लागून खर्च कमी होईल तसेच पर्यावरणही अनुकूल राखले जाईल, असं त्यांनी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा